तब्बल ३२ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या वंशविच्छेदाचे सत्य उद्या, ११ मार्चला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येईल. या निमित्ताने १९९० च्या दशकात जिहाद्यांनी काश्मिरी हिंदूंच्या घडवलेल्या प्रचंड नरसंहाराला ३२ वर्षांनी का होईना; पण वाचा फुटेल. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नेहमीप्रमाणे काहींनी या चित्रपटाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करून विरोध दर्शवला; परंतु मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. काश्मीरमधील स्थितीवर हा पहिलाच चित्रपट नव्हे. यापूर्वी हिंदी, इंग्रजी भाषांतून अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दिग्दर्शक अग्निहोत्री यांच्याच शब्दांत सांगायचे, तर काश्मीरवर आजपर्यंत निघालेल्या चित्रपटांचे कथानक ‘भारतीय सैन्याकडून काश्मीरमधील लोकांवर अन्याय केला जातो, तेथील महिलांवर अत्याचार केले जातात आणि म्हणून तेथील लोक हातात बंदुका घेतात’, असे राहिले आहे. यांतून केवळ जिहादी आतंकवादाचे उदात्तीकरण करण्यात आले. जगासमोर भारताची प्रतिमा मलीन करण्यात आली. जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेला ‘द कश्मीर फाइल्स’लाच विरोध का केला जातो ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? अर्थात् या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातच दडलेली आहेत ! हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या विरोधात आळवलेल्या सुरात काँग्रेसी, डावे, पुरो(अधो)गामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी सूर मिसळत असतात. याउलट या हिंदूंच्या बाजूने जे जे काही असते, त्याला विरोध करण्यासाठी एक फळीच कार्यरत असते. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट निर्माण करतांना विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या वाट्यालाही हा अनुभव आला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, हा चित्रपट निर्माण होण्याच्या अगदी प्राथमिक टप्प्यात असतांना एका हिंदुद्वेषी वृत्तवाहिनीने या चित्रपटाच्या विरोधात वृत्तप्रसारित करून लोकांची मने आधीच कलुषित करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अन्य एका हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाने सदर हिंदुद्वेषी वृत्तवाहिनीला उघडे पाडून सत्य जनतेसमोर आणले.
येथेच या चित्रपटाची उपेक्षा संपली असे नाही, तर नुकताच या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यास ‘द कपिल शर्मा शो’ या ‘रिॲलिटी शो’चे (प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात येणार्या कार्यक्रमाचे) प्रमुख कपिल शर्मा यांनी नकार दिला. यावरून शर्मा यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली. याच कपिल शर्मा यांनी ‘हैदर’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या असंख्य चित्रपटांचे विज्ञापन केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. यावरून धर्माच्या आधारे हिंदूंचा नरसंहार करणे, हा गुन्हा नसतो; पण तो चित्रपटात दाखवणे, हा गुन्हा असतो ! अशी सध्याची ‘निधर्मी’ व्याख्या बनली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे ३२ वर्षांपासून हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य आता लोकांसमोर येईल. ‘सत्य परेशान होता है, पराजित नही’ म्हणतात ते हेच.
कारवाई सोडाच; पण साधा गुन्हाही नोंद नाही !
जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीर खोर्यातून तब्बल साडेचार लाख हिंदूंना हुसकावून लावले, प्रचंड नरसंहार केला, हिंदु महिलांवर बलात्कार केले; पण या प्रकरणी कुणावर कारवाई सोडाच; पण साधा एक गुन्हाही नोंदवण्यात आलेला नाही. समजा तो नोंदवला असेल, तर सरकारने त्याचा तपशील जनतेपुढे सादर करायला हवा. असा तपशील आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारने जनतेपुढे सादर केलेला नाही. एवढा प्रचंड नरसंहार होऊनही एकालाही साधी शिक्षा झालेली नाही ! असे केवळ भारतातच होऊ शकते. मध्यंतरी पुरुषांच्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांनी ‘मी टू’ (मी सुद्धा) नावाची मोहीम उघडली होती. यांत काही २०-२० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांच्या प्रकरणी संबंधित पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधित पुरुषांविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला होता. म्हणजे गुन्हा कितीही वर्षांनी उघड झाला, तरी तो गुन्हाच असतो आणि गुन्हेगार शिक्षेस पात्रच असतो; परंतु दुर्दैवाने असे काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या संदर्भात दिसून येत नाही. जिहाद्यांविरुद्ध कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ऐकिवात नाही. एवढेच नव्हे, तर या प्रकरणी न्यायालयात काही वर्षांपूर्वी प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे विद्यमान सरकारने आता तरी या प्रकरणी सत्य जनतेसमोर आणून दोषींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
काही दिवसांपूर्वी हा चित्रपट जम्मूतील विस्थापित काश्मिरी हिंदूंना दाखवण्यात आला. तो पाहून ते चित्रपटगृहातच किंकाळ्या देत रडू लागले. याविषयीचा हृदयद्रावक व्हिडिओ सामाजाक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यावरून त्यांच्या ३२ वर्षांपूर्वीच्या भळभळत्या जखमा आजही कायम आहेत, हे स्पष्ट होते. आजही विस्थापित काश्मिरी हिंदूंचे जीवन संघर्षमय आहे. ते आजही छावण्यांमध्ये विस्थापितांचे जीवन जगत आहेत. त्यांच्यावर स्वतःच्याच मायदेशात विस्थापित होण्याची वेळ ओढवली आणि आतापर्यंतची सर्वपक्षीय सरकारे त्यांच्यासाठी काहीही करू शकलेली नाहीत, हे संतापजनक वास्तव आहे. त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रेक्षक उत्साहात स्वागत करतीलच; पण पुढे काय ? हा प्रश्न कायम रहातो. याच विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या लालबहाद्दुर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटानंतर पुढे काय झाले ? असे वास्तवाधारित चित्रपट केवळ मनोरंजनापुरते नसतात. त्यांचा उद्देश सत्य जनतेपर्यंत पोचवणे, हा असतो. त्यामुळे सरकारने त्यांची नोंद घेऊन आवश्यक ती उपाययोजना काढणे अपेक्षित असते. असे करण्यात सरकार अल्प पडत असेल, तर जनतेने त्यांना तसे करायला भाग पाडले पाहिजे. आपण इतिहासातून काही शिकलो नाही, तर इतिहासही आपल्याला धडा शिकवल्याविना रहात नाही, हे हिंदूंनी आणि सरकारने लक्षात ठेवलेले बरे !