युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी युक्रेनमधून पलायन केल्याच्या दाव्यावर दिले उत्तर !
कीव (युक्रेन) – मी राजधानी कीवमध्येच आहे आणि कुणालाही घाबरत नाही. मी कोणत्याही छावणीत लपून बसलेलो नाही. हे युद्ध जिंकेपर्यंत मी राजधानी कीवमध्येच रहाणार आहे, असे प्रतिपादन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केले. त्यांनी युक्रेनच्या नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. झेलेंन्स्की पोलंडला पळून गेल्याची आवई उठवण्यात आली होती. त्याला उत्तर म्हणून झेलेंस्की यांनी हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यासह ते राष्ट्रपती भवनात फेरफटका मारत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. झेलेंस्की यांनी ‘इन्स्टाग्राम’द्वारेही ‘ते नेमके कुठे आहेत ?’, हे दाखवत ‘रशियाने ठार मारून दाखवावे’, असे आव्हान रशियाला दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २४ फेब्रुवारीपासून रशियाच्या मारेकर्यांनी ३ वेळा झेलेंस्की यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे.
१७ लाख लोकांनी युक्रेन सोडले
- युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या १७ लाख ३५ सहस्रांहून अधिक झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने म्हटले आहे.
- देशातून बाहेर पडलेल्या लोकांपैकी अनुमाने १० लाख ३० सहस्र लोक पोलंडमध्ये, १ लाख ८० सहस्र लोक हंगेरीमध्ये, तर १ लाख २८ सहस्र लोक स्लोव्हाकियात गेले आहेत.