तळवडे (ता. राजापूर, रत्नागिरी) येथे पितांबरी डिजिटल केअर सोल्युशन्स प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन !
रत्नागिरी – पितांबरीचे सर्वेसर्वा श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी नफ्या-तोट्याचा विचार न करता केवळ सामाजिक बांधीलकीतून तळवडेसारख्या ग्रामीण भागात ‘पितांबरी डिजिटल केअर सोल्युशन्स प्रशिक्षण केंद्र’ चालू केले आहे, असे प्रतिपादन पितांबरीच्या तळवडे-ताम्हाणे युनिटचे प्रमुख श्री. तुषार हळदवणेकर यांनी केले. ते राजापूर तालुक्यातील तळवडे येथील पितांबरी इस्टेट येथे उपरोल्लेखित प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी पितांबरीचे आयटी विभाग प्रमुख श्री. विजय पाटील या प्रशिक्षण केंद्राचे वैशिष्ट्य सांगतांना म्हणाले की, या केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव या ठिकाणी प्राप्त होणार आहे, तरी गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
या वेळी पाचल आणि ताम्हाणे येथील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक अनुक्रमे श्री सिद्धार्थ जाधव आणि श्री. विजय पाटील यांनी हे प्रशिक्षण केंद्र चालू केल्याविषयी पितांबरी आस्थापनाचे सर्व उपस्थितांच्या वतीने आभार मानून सर्वतोपरी साहाय्य करण्याची ग्वाही दिली.
या वेळी पितांबरीचे प्रॉडक्शन हेड सुहास प्रभुदेसाई; प्रॉडक्शन प्रभारी, तळवडेचे श्री प्रदीप प्रभुदेसाई आदी मान्यवरांसह तळवडे आणि पाचल येथील बहुसंख्य प्रतिष्ठित आणि विद्यार्थी उपस्थित होते.