७ मार्च २०२२ या दिवशी ‘प.पू. दास महाराज यांना स्वामी चिन्मयानंद यांची समाधी, निर्विकल्प समाधी आणि अमृतवृष्टी यांविषयी सांगितलेली सूत्रे’ पाहिली. आज उर्वरित भाग पाहू.
३. प.पू. दास महाराज यांची गुरुपरंपरा
आदिनारायणं विष्णुं
ब्रह्माणं च वसिष्ठकम् ।
श्रीरामं मारुतिं
वन्दे रामदासं च श्रीधरम् ।।
अर्थ : आदिनारायण, विष्णु, ब्रह्मा, वसिष्ठ, श्रीराम, मारुति, रामदास आणि श्रीधरस्वामी यांना मी वंदन करतो.
४. पूर्वी भगवान श्रीधरस्वामींचे दर्शन होणे, आता सनातन संस्थेत आल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले अन् त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे आणि सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल होणे
अ. आदिनारायण, विष्णु, ब्रह्मा, वसिष्ठ, राम, मारुति, रामदास आणि श्रीधर ही माझी पहिली गुरुपरंपरा होती. यापूर्वी मला भगवान श्रीधरस्वामींचे दर्शन घडायचे.
आ. माझे लग्न झाल्यानंतर मी सनातन संस्थेमध्ये आलो आणि मला परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु मिळाले. त्यानंतर नामजपादी उपायांच्या माध्यमातून माझा ध्यानयोग चालू झाला. मी रामनाथी आश्रमात ध्यानाला बसतो. त्या वेळी मला प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घडते. त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन घडते. यापुढील गुरुपरंपरा अजून दिसली नाही. मी येथेच स्थिर झालो आहे. मला श्री अनंतानंद साईश, प.पू. चंद्रशेखरानंद स्वामी यांचे दर्शन झाले नाही. मला श्री अनंतानंद साईश सावलीच्या रूपातच दिसतात. त्यांचा स्थूल आकार दिसत नाही.
इ. माझा प्रवास खालून वर चालला आहे आणि शेवटी तो वर म्हणजे मूळ गुरुरूप प.पू. चंद्रशेखरानंद यांच्यापर्यंत जाणार आहे, म्हणजे निर्गुणाकडून निराकाराकडे वाटचाल होणार आहे.
ई. मी कर्मकांड करून यज्ञ-याग करत होतो, त्या वेळी मी सगुणात होतो. त्यानंतर गुरुदेवांनी मला नामजपादी उपाय करायला सांगून मला निर्गुणाची वाटचाल करायला शिकवली. आता ते मला निर्गुणाकडे घेऊन चालले आहेत. सध्या मी निर्गुणाची वाटचाल करत आहे. निराकाराकडे गेलो की, देह सोडू शकतो, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असा प्रवास होईल.
उ. माझी विदेही स्थिती अजून झाली नाही. ज्या वेळी ध्यान सहस्रारचक्रात जाईल, तेव्हा विदेही स्थिती, म्हणजे समाधी अवस्था होईल. तेव्हा तहान-भूक हे सर्व नष्ट होतात.’ (समाप्त)
– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२०)