कोल्हापूर, ७ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाचा तिसरा खेटा (माघ मासात पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणार्या यात्रेस जोतिबाचे खेटे म्हणतात.) ‘चांगभल’च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी दोन लाखांहून अधिक भाविकांनी गुलाल खोबर्याची उधळण करून श्री जोतिबादेवाचे दर्शन घेतले. श्री जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी श्री जोतिबा देवाच्या मानाच्या अश्वाचे निधन झाल्यामुळे धुपारती सोहळा प्रथमच अश्वाविना पार पडला. माघ पोर्णिमेनंतर येणार्या रविवारपासून चालू झालेल्या या ‘खेटे यात्रे’चा आज तिसरा खेटा होता. परिसरातील अनेक भाविक श्री जोतिबा मंदिरात चालत आले होते. पहाटे ४ वाजता घंटानाद करून मंदिराचे द्वार भाविकांसाठी उघडण्यात आले. गेली २ वर्षे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्ध आणि लहान मुले यांना मंदिरात प्रवेश नव्हता.