चर्चेतून प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य द्यावे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दूरभाष

  • पहिल्या दिवशी युक्रेनमध्ये १३७ जणांचा मृत्यू

नवी देहली – रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारीला रात्री उशिरा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दूरभाष करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या चर्चेत आरंभी पुतिन यांनी सध्याच्या घडामोडींविषयी पंतप्रधान मोदी यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात’, असे सांगत हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. यासह सर्व बाजूंनी संघटित प्रयत्नांद्वारेच चर्चेमधून वाटाघाटी करून हा प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.

अडकलेल्या भारतियांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसह त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यास भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी नमूद केले. या प्रकरणी दोन्ही देशांतील अधिकारी सतत संपर्कात रहातील, यावर उभय नेत्यांचे एकमत झाल्याचेही सांगण्यात आले.

पहिल्या दिवशी युक्रेनमध्ये १३७ जणांचा मृत्यू

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धात पहिल्याच दिवशी, म्हणजे २४ फेब्रुवारीला १३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेने दिली.