पाटण (सातारा) येथे मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

अल्पवयीन आणि मतिमंद मुलींवर अत्याचार करण्यामध्ये स्त्रियांचा समावेश असणे संतापजनक आहे. अशा महिलांना आणि संबंधितांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे. – संपादक 

सातारा, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – पाटण (जिल्हा सातारा) येथे एका मतिमंद अल्पवयीन मुलीला खाऊ आणि पैशाचे आमीष दाखवून वेळोवेळी अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. याविषयीची तक्रार पीडित मुलीच्या आईने पाटण पोलिसात दिली आहे. पाटण पोलिसांनी ९ संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयात उपस्थित केले असता ८ आरोपींना १० दिवसांची, तर महिला आरोपीला लहान मुल असल्यामुळे ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या घटनेचा समाजातील सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

२७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत पाटण येथील एका महिलेने एका मतिमंद मुलीच्या पाटण आणि परिसरातील काही लोकांच्या ओळखी करून दिल्या; तसेच संबंधितांशी बळजोरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानुसार पाटण आणि परिसरातील ८ व्यक्तींनी अल्पवयीन मतिमंद पीडित मुलीवर वेळोवेळी, वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.