‘समलैंगिकता आजार असून त्यावर उपचार करून अनेक पुरुषांना ‘बरे’ केले’, असा दावा करणार्‍या मानसोपचार तज्ञाची चौकशी होणार !

मानसोपचार तज्ञ डॉ. दीपक केळकर

मुंबई – ‘समलैंगिकता हा एक आजार आहे. मी त्यावर उपचार करून अनेक पुरुषांना ‘बरे’ केले आहे. तसेच औषधोपचारांच्या साहाय्याने पुरुषांना इतर पुरुषांकडे आकर्षित न होण्यासाठीही उपचार केले आहेत, असा दावा मानसोपचार तज्ञ डॉ. दीपक केळकर यांनी केला आहे. या सूत्रांवर वाद झाल्यानंतर डॉ. केळकर यांच्या विरोधात चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. केळकर यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर यासंदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे. डॉ. केळकर यांच्या विरोधात मुंबईत समलैंगिक समुदायासाठी काम करणार्‍या डॉ. प्रसाद दांडेकर यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीची तातडीने नोंद घेण्यात आली असून डॉ. केळकर यांची चौकशी चालू करण्यात आली आहे.