नवी मुंबई – २७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस आपण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा करतो. यंदा २७ फेब्रुवारी या दिवशी राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ मोठ्या प्रमाणात साजरा करा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राज ठाकरे यांनी याविषयी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पूर्वीही दिनदर्शिकेत हा दिवस होता; परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा केला जात नव्हता. आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या ‘मराठी भाषेचा गौरव’ त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषिकांनी या देशाच्या फार मोठ्या भागावर आपले राज्य एकेकाळी प्रस्थापित केले होते. या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता.