सांगेली केंद्र शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या लेखी आश्‍वासनानंतर ग्रामस्थांकडून उपोषण मागे

  • शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • निधी द्यायचा होता, तसेच ३१ मार्चपूर्वी काम पूर्ण करणे शक्य होते, तरीही प्रशासनाने आंदोलन करण्यास का भाग पाडले ?

सावंतवाडी – तालुक्यातील सांगेली येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी सांगेली ग्रामस्थांनी १६ फेब्रुवारीला उपोषण चालू केले होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण समितीच्या सभापती सौ. अनिषा दळवी यांनी ‘शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच ३१ मार्चपूर्वी काम पूर्ण केले जाईल’, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. सांगेली केंद्र शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंची मुले शिक्षण घेतात. पंचक्रोशीतील ही सर्वांत मोठी शाळा आहे. या शाळेचे छप्पर धोकादायक झाल्याने त्याची दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थ शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती यांच्याकडे सातत्याने मागणी करत होते; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण चालू केले होते, तसेच ‘जोपर्यंत ठोस निर्णय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील’, अशी चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली होती.