फलटण, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला होता; मात्र फलटण नगरपालिकेने याची नोंद न घेता पालिकेसमोरील राष्ट्रध्वज नेहमीप्रमाणे फडकत ठेवला होता. यामुळे सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रीय दुखवटा घोषित झाल्यानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवावा लागतो; परंतु फलटण नगरपालिकेने असे केले नाही. याविषयी मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता ‘राष्ट्रध्वजाचे उत्तरदायित्व कुणाकडे आहे ? याची चौकशी करतो. याविषयीची सत्यता पडताळून पहातो’, असे उत्तर देण्यात आले. (उत्तरदायित्व कुणाकडे आहे ? असे सांगून दायित्व ढकलणारे नकोत, तर ‘या चुकीचे दायित्व माझेच आहे’, अशा विचारसरणीचे अधिकारी असतील तरच प्रशासकीय कारभार अचूक होईल, असेच जनतेला वाटते. – संपादक)