‘आपले दैनंदिन काम चालू असते आणि अकस्मात् एखाद्या दिवशी वेगळेपण जाणवते. ‘आपल्याला घडणार्या घटनेची चाहूल लागलेली असते; परंतु ती काय घडणार आहे ?’, हे नेमकेपणाने ठाऊक नसते. ज्या वेळी घटना घडते, त्या वेळी ‘आपल्या मनाला वेगळेपणा का जाणवत होता ?’, याचा थोडासा संदर्भ लागतो आणि त्याच वेळी ती घटना लक्षात येते. मग ती घटना काही वेळा वाईट असते, तर काही वेळा उच्च आध्यात्मिक स्वरूपाची असते.
१. वाईट घटनेची लागलेली चाहूल
१ अ. एका रात्री लांबवर एक कुत्रा अतिशय भेसूर आवाजात ओरडणे आणि लगेचच दुसर्या दिवशी सकाळी दूरदर्शनवर एका नेत्याची हत्या झाल्याची वार्ता समजणे : एका रात्री लांबवर एक कुत्रा अतिशय भेसूर आवाजात ओरडत होता. तेव्हा मनात विचार आला, ‘हा असा का ओरडतोय ? कळत नाही. ‘कुठे काही घडणार आहे का ?’, हे सर्व देवच जाणे.’ दुसर्या दिवशी सकाळी दूरदर्शनवर ‘एका नेत्याची हत्या झाली’, अशी वार्ता समजली आणि ‘रात्री कुत्र्याचा भेसूर आवाज का येत होता ?’, याचे कारण लक्षात आले.
२. उच्च आध्यामिक स्वरूपाची घडलेली घटना !
२ अ. कितीतरी वर्षांनी मनात ‘आकाश पांघरूनी । जग शांत झोपलेले ।’ या ओळी आठवून ‘त्या सतत आळवाव्यात’, असे वाटणे आणि त्या वातावरणाचा अनुभव घ्यावासा वाटणे : १२.२.२०१९ या दिवशी रथसप्तमी होती. मला सकाळी ६.१५ वाजता जाग आल्यावर कितीतरी वर्षांनी मनात काही ओळी आठवून ‘त्या सतत आळवाव्यात’, असे वाटत होते आणि आळवल्या जात होत्या.
आकाश पांघरूनी । जग शांत झोपलेले ।
घेऊनी एकतारी । गातो कबीर दोहे । आकाश पांघरूनी ।। १ ।।
वातावरण त्या ओळींना साजेसे वाटत होते, तरी मनात प्रश्न उमटत होते, ‘कबीर का गात असेल ? तो गात असलेली जागा कशी असेल ? तो या जगाच्या बजबजपुरीला कंटाळून दोहे गात आहे का आणि म्हणून तो जग झोपलेले असतांना दोहे गात आहे का ?’ ‘मला त्याच्या संगतीत राहून त्या वातावरणाचा अनुभव घ्यावा’, असे वाटत होते.
२ आ. वरील विचारात मग्न असतांना ‘अंबर सभागृहात होणार्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे आहे’, असा निरोप मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या पादुकांचे षोडशोपचारे पूजन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी करणे अन् ‘न भूतो न भविष्यति’ असा हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ‘याचि देही याची डोळा’ पहायला मिळणे : मी या विचारातच मग्न होतो. तेव्हा निरोप आला, ‘आज अंबर सभागृहात कार्यक्रम आहे, तरी त्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला उपस्थित रहायचे आहे.’ तेव्हा मनात ‘कुणाची तरी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणार असेल किंवा कुणीतरी संतपदाला गेल्याचे घोषित होणार असेल’, असे वाटले. मी या विचारातच अंबर सभागृहात गेलो. तो कार्यक्रम पहातांना माझ्या आश्चर्याला पारावारच उरला नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पादुका धारण केल्या होत्या आणि त्या गुरुपादुकांचे षोडशोपचारे पूजन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत होत्या. नंतर त्या पादुकांची प्रतिष्ठापना ध्यानमंदिरात करण्यात आली. हा कार्यक्रम पूर्णतः आध्यात्मिक स्तरावरील होता. असा ‘न भूतो न भविष्यति’ कार्यक्रम ‘याचि देही याची डोळा’ पहायला मिळाला.
२ इ. ‘सकाळी आठवलेल्या ओळीतील कबीर म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत’, असे जाणवणे : तो ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहात असतांना ‘देव सकाळी त्या ओळी का लक्षात आणून देत होता ?’, हे लक्षात आले. त्यातील कबीर म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून साक्षात् आमचे परात्पर गुरु डॉ. आठवलेच होते. ‘त्यात जे वर्णन केले होते, ती भूमिका स्वतः गुरुदेव पार पाडत होते’, असे वाटले. मी एकीकडे सोहळ्याचा आनंद घेत होतो, तर दुसरीकडे भैरवीतील हळव्या सुरांविषयी मनाला हुरहूर वाटत होती. आमच्यासाठी ज्यांनी पूर्ण आयुष्य दिले आणि त्यांनी काहीही करायचे शिल्लक ठेवले नाही, त्यांचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडत आहेत. ‘गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असे आम्ही काहीच केले नाही, यासाठी आम्हाला क्षमा करा !’
२ ई. श्री. विनायक शानभाग यांनी सूत्रसंचालनही चांगले केले. त्याला तोड नाही. त्यांचा संयम, भाव आणि शब्दांवर असलेली पकड फारच सुंदर होती. ती कायम आठवणीत राहील.
‘गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळेच आम्हाला हा भव्य दिव्य सोहळा पहायला मिळाला आणि मला हे थोडेसे मनोगत व्यक्त करायला मिळाले, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. प्रताप जोशी, रत्नागिरी (२४.२.२०१९)
३. या धारिकेचे संकलन करत असतांना भाव जागृत होणे आणि गुरुदेवांची आठवण येऊन अनेक प्रसंग डोळ्यांसमोरून जाणे अन् त्या वेळी ‘देवाशी एकरूप झाले आहे’, असे वाटणे
‘या धारिकेचे संकलन करत असतांना माझाही भाव जागृत होत होता आणि गुरुदेवांची आठवण येऊन अनेक प्रसंग डोळ्यांसमोरून जात होते. तेव्हा मी माझी राहिले नव्हते, तर ‘देवाशी एकरूप झाले आहे’, असे वाटत होते. हे सर्व घडत असतांना मी आनंदाची अनुभूती घेत होते.’
– श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०१९)