पुणे – नदीची स्वच्छता आणि सुशोभिकरण यांसाठी महापालिकेने ‘मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प’ हाती घेतला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवतांना नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग सिद्ध केले जाणार आहेत, तर नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी काढून ते उंच करावे लागणार आहेत. या प्रकल्पाकरिता ४ सहस्र ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय जल आणि विद्युत् संशोधन केंद्राची मान्यताही मिळाली आहे. यामध्ये नदी प्रदूषणमुक्त करणे, प्रवाहातील अडथळे दूर करणे, नदी तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास आणि सुशोभिकरण, पुराचा धोका अल्प करणे, असे विविध उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘नदी सुधार प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे.
नुकतेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पाचे डिजिटल सादरीकरण केले.