सातारा, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – जावळी तालुक्यातील खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने फायबर बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खिरखिंडी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वसलेले आहे. या गावात ७ कुटुंबे असून गावाची लोकसंख्या केवळ २५ आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अंधारी या गावी जावे लागते. व्याघ्र प्रकल्पासाठी खिरखिंडी ग्रामस्थांसह ४-५ गावांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे केले आहे. अशी एकूण ७० कुटुंबे पुनर्वसित आहेत; मात्र त्यातील ७ कुटुंबे खिरखिंडीतच रहात आहेत. याच कुटुंबातील ४ मुले आणि ४ मुली अंधारी येथील विद्यालयात प्रतिदिन ये-जा करतात. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना ‘लाईफ जॅकेट’ आणि फायबर बोट उपलब्ध करून दिली आहे.
प्रतिदिन शिक्षणासाठी विद्यार्थी असा करतात प्रवास…
खिरखिंडी गावातील विद्यार्थ्यांना घरापासून कोयना जलाशयापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. तेथून पुढे कोयना जलाशय ते शेंबडी मठ जलाशयातील ६०० मीटर प्रवास बोटीने करावा लागतो. पुढे अंधारी येथील विद्यालयाला जाण्यासाठी फळणीमार्गे १ घंटा पायी प्रवास करावा लागतो. अंधारी येथील विद्यालय हे अनिवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांना येऊन-जाऊन विद्यार्जन करावे लागते.