कॅनडातील ट्रकचालकांच्या आंदोलनावरून सामाजिक माध्यमांतून कॅनडाच्या पंतप्रधानांवर भारतियांकडून टीका !

  • कॅनडात कोरोना लसीकरणाच्या संबंधी अध्यादेशाच्या विरोधात ट्रकचालकांच्या चालू असलेल्या आंदोलनाचे प्रकरण

  • पंतप्रधान ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनावरून भारताचा केला होता विरोध !

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या विरोधात सहस्रावधी ट्रकचालक आणि नागरिक यांनी आंदोलन चालू केले आहे. ट्रकचालकांच्या या मोर्च्याला ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ (स्वातंत्र्याची मागणी करणारा समूह) असे नाव देण्यात आले आहे. त्यांना अत्यल्प काळातच आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोट्यवधी रुपयांचे साहाय्य मिळाले आहे. त्यामुळे हे आंदोलन काही आठवडे चालू राहू शकते. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय शक्तींचा पाठिंबा असून कॅनडाने ‘आमच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये कुणी हस्तक्षेत करू नये’, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी भारतात या आंदोलनाशी साधर्म्य असणार्‍या शेतकरी आंदोलनाला पंतप्रधान ट्रुडो यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे सामाजिक माध्यमांवरून ट्रुडो यांच्यावर टीका केली जात आहे.

१. भारतातील कृषीसंबंधी नवीन कायद्यांच्या विरोधात वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये देहली, पंजाब अन् अन्य काही ठिकाणी शेतकर्‍यांनी अनेक मास आंदोलन केले होते. त्यामागे खलिस्तानवादी आणि जिहादी शक्ती असल्याचे नंतर समोर आले.

२. त्या आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी भारतावर टीका केली होती. त्यामुळे आता भारतीय नागरिकांकडून ट्रुडो यांना ट्रकचालकांच्या आंदोलनावरून सुनावले जात आहे आणि भारताची क्षमायाचना करण्याची मागणी केली जात आहे.

३. ट्रुडो यांच्या घराला २० सहस्र ट्रकचालकांनी २ दिवसांपूर्वी घेराव घातल्याने ट्रुडो आणि त्यांचा परिवार यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. पंतप्रधान ट्रुडो आंदोलनाला घाबरल्याची टीका करण्यात येत आहे.

४. यावर ट्रुडो यांनी ट्वीट करत स्वत:ची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले, ‘मला  कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या मला बरे वाटत असून अलगीकरणात राहून काम चालूच आहे.’ या ट्वीटमध्ये त्यांनी नागरिकांना पुन्हा एकदा ‘कृपया लस घ्या’, असे आवाहनही केले आहे.

काय आहे प्रकरण ?

१५ जानेवारी या दिवशी पंतप्रधान ट्रुडो यांनी कोरोना लसीकरणाच्या अंतर्गत एक अध्यादेश काढला. त्यामध्ये अमेरिकेतून कॅनडामध्ये येणार्‍या आणि लसीकरण न झालेल्या ट्रकचालकांना १४ दिवस अलगीकरणात रहावे लागण्याची सक्ती करण्यात आली आहे. यास लसीकरण न झालेल्या ट्रकचालकांनी विरोध दर्शवत आंदोलन चालू केले आहे.

अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मोठ्या प्रमाणावर ट्रक वाहतूक चालते. कॅनडातून अमेरिकेला ट्रक वाहतूक करणार्‍यांची संख्या अनुमाने १ लाख २० सहस्र असून, कॅनडातील शेती उत्पादने, तसेच आयात-निर्यात प्रामुख्याने याच मार्गे होते. ९० टक्के ट्रकचालकांचे लसीकरण आधीच पूर्ण झाले आहे.