मुंबई – ‘गूगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यासह अन्य सहा अधिकार्यांच्या विरोधात स्वामित्व हक्कांचे (कॉपीराईट) उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने अंधेरी एम्.आय.डी.सी. पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी याविषयी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यात त्यांनी म्हटले आहे, ‘माझ्या चित्रपटाचे स्वामित्व हक्क मी कुणालाही विकलेले नाहीत. तरी हा चित्रपट अवैधपणे यु ट्यूबवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या चित्रपटाला यु ट्यूबवर अब्जावधी प्रेक्षकसंख्या लाभली आहे; मात्र चित्रपटाची निर्मिती माझी आहे, स्वामित्व हक्क माझ्याकडे आहेत, तरीही मला कुठल्याही प्रकारे आर्थिक मोबदला देण्यात आलेला नाही.’