हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम
वाराणसी (उत्तरप्रदेश) – १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये, कचर्यावर पडलेले आढळून येतात. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. तसेच सध्या दुकानांमधून किंवा ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याप्रमाणे मास्क विकले जाणे, हे ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. अशा प्रकारे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहारमध्ये पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे जिल्हाधिकारी अन् पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी वाराणसी येथे अधिवक्ता अरुणकुमार मौर्या, अधिवक्ता स्वतंत्र सिंह, अधिवक्ता कमलेशकुमार सिंह, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता सुधीरकुमार चंचल, अधिवक्ता अभिषेक कुमार, अधिवक्ता राहुल कुमार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी आदी उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
निवेदन देतांना वाराणसी येथील अपर पोलीस आयुक्त म्हणाल्या, ‘‘तुम्ही राष्ट्रहितासाठी अतिशय चांगले कार्य करत आहात. याविषयी कार्यवाहीसाठी मी लगेच सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देते. याविषयी तुमच्याकडे ध्वनीफित असेल, तर तीही माझ्याकडे द्या. ती आम्ही वाराणसीमध्ये सर्वत्र ऐकवू.’’