आध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेल्या मिलिंद चवंडके यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान !

नगर – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या संस्थेने उत्तर महाराष्ट्र विभागामधून वर्ष २०२० चा राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार आध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेले पत्रकार आणि इतिहास संशोधक मिलिंद सदाशिव चवंडके यांना सपत्नीक समारंभपूर्वक प्रदान केला. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानपत्र, अडीच सहस्र रुपये रोख, शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ असे होते.

पत्रकार मिलिंद चवंडके यांना पुरस्कार देतांना वसंत भोसले आणि सौ. सोनाली चवंडके यांना पुरस्कार प्रदान करतांना ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, तसेच अन्य

राज्यस्तरीय पत्रकारदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याचे अध्यक्षस्थान ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’चे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी भूषविले. ज्येष्ठ पत्रकार तथा ‘दैनिक लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. मिलिंद सदाशिव चवंडके

राज्यभरातून आलेल्या दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकारांच्या वतीने बोलतांना मिलिंद चवंडके म्हणाले, ‘‘पत्रकारितेचे व्रत घेऊन अडीच तप पूर्ण झाल्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ने ‘दर्पण’ पुरस्कार देऊन केलेला सन्मान माझ्या पत्रकारितेच्या कार्याची पावती देणाराच ठरला आहे. पंढरीची पायी वारी करणार्‍या लाखो वारकर्‍यांपैकी फक्त एकाच वारकर्‍यास पांडुरंगाच्या शासकीय महापूजेत मान मिळतो, तसा ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ने उत्तर महाराष्ट्र विभागामधून वर्ष २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारासाठी माझी निवड केल्याविषयी मी भारावून गेलो आहे. हा सन्मान जीवनाला स्फूर्ती देणारा आहे. संस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.’’

रवींद्र बेडकिहाळ यांनी आध्यात्मिक कार्यात दिलेल्या योगदानाविषयी मिलिंद चवंडके यांची विशेष ओळख करून दिली. वसंत भोसले यांनी आध्यात्मिक पत्रकारिता आणि इतिहास संशोधन या मिलिंद चवंडके यांच्या वेगळेपणाच्या कार्याची प्रशंसा केली.

कार्यक्रमास आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वंशज सुधाकर जांभेकर, ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’चे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, विश्वस्त सौ. अलका बेडकीहाळ (फलटण), अमर शेंडे, माध्यम तज्ञ योगेश त्रिवेदी (मुंबई), शिवसेना वैद्यकिय साहाय्य कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे (मुंबई), शांताराम गुरव, रोहित वाकडे, ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघा’चे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, डॉ. रमेश गोटखडे (अमरावती) यांच्यासह ‘दर्पण’ पुरस्कारप्राप्त महाराष्ट्राच्या विविध विभागांमधील सन्मानार्थी उपस्थित होते. वर्ष २०१९ च्या ‘दर्पण’ पुरस्काराचेही वितरण याच कार्यक्रमात करण्यात आले.

क्षणचित्र – महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या पत्रकारांनी मिलिंद चवंडके यांना भेटून अध्यात्मिक पत्रकारिता आणि इतिहास संशोधन हे वेगळेच क्षेत्र पत्रकारितेसाठी निवडल्याविषयी कौतुक केले.