दळणवळण बंदीमुळे बर्याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप वाटते. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत. मुलांना शिक्षकांची आवश्यकताच वाटेनाशी होत आहे. ‘आता काय सगळेच ‘यूट्यूब’वर आहे. त्यामुळे कशाला माहिती डोक्यात साठवा ?’, असेही मुले सहजपणे म्हणतात. मी या शिक्षणाच्या विरोधात नाही; पण लहान मुलांच्या डोक्यात इतक्या झपाट्याने हे सर्व आदळते की, ती मुले बिचारी कावरीबावरी झाली आहेत. ‘स्क्रीन’साठी ती ‘पॅनिक’ होत आहेत. त्यात आता मुले २४ घंटे घरात आहेत. मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी (टीव्ही) आणि भ्रमणभाष हे ओघाने आलेच.
१. मुलांच्या कल्पकतेला वाव देणे आवश्यक
मुलांची कल्पकता आणि सृजनशीलता यांना आपण वेळ देत आहोत का ? अनेक तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ञ यांचे असे मत आहे की, शांततेत सृजनता फुलते. असे केल्यास ती मुले स्वतःच आपले खेळ निर्माण करतात. या वेळीही ती अभ्यासच करत असतात. शिकवण्यापेक्षा स्वतःच्या चुका आणि अनुभव यांतून शिकणे पुष्कळ मोलाचे आहे. काय माहीत, आज पालकांना ‘ऑनलाईन’ अभ्यासाची आवश्यकता भासवून बिनबुडाचा धोका निर्माण करून काही लोक कोट्यवधी रुपये कमवत नसतील ना ?, याचा विचार करा.
२. मुलांना अनेक गोष्टी शिकवण्याची सुसंधी
आई आणि बाबा म्हणून मुलांना वेळ देणे आवश्यक आहे. माझ्या ओळखीचे एक गणिततज्ञ आहेत. एकदा मी त्यांना विचारले की, तुम्हाला गणिताची कशी काय आवड निर्माण झाली ? यावर ते म्हणाले, ‘‘माझे बाबा मी उठायच्या आत प्रतिदिन फळ्यावर एक गणित लिहून ठेवत आणि ते सोडवल्यावरच खाली खेळायला सोडत असत. प्रतिदिन वेगळा विचार आणि वेगळे गणित, यात गंमत येत असे. यातच गोडी लागली. मी प्रतिदिन जेवणापूर्वी पाढे म्हणायचो.’’
३. मुलांसाठी पालकांनी गुणवत्तापूर्ण वेळ देणे आवश्यक
बर्याच गोष्टी आहेत, ज्या आपण मुलांना शिकवू शकतो. संस्कारांची शिदोरी आपण या शिकवण्यातून देत असतो. सोपे सांगायचे, तर मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ (‘क्वालिटी टाइम’) द्यायला हवा. विचार करा आणि या ‘ऑनलाईन’च्या गुदमरून टाकणार्या, ताण देणार्या शिक्षणापेक्षा आपला वेळ अन् सहवास त्यांना द्या !
– आशा भालेकर (एम्.ए., बी.एड्., एम्.फील)
(संदर्भ : व्हॉट्सॲपवर आलेले लिखाण)