महंत मावजीनाथ महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍याला त्वरित अटक करण्यात यावी !

अशी मागणी का करावी लागते ? आक्रमण झाल्यावर लगेचच प्रशासन कारवाई का करत नाही ? – संपादक 

महंत मावजीनाथ महाराज

धाराशिव, १५ जानेवारी (वार्ता.) – येथील जिल्हा न्यायालयासमोर तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमणाच्या उद्देशाने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणारे प्रदीप प्रभाकर मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजापूर येथील सोमवारगिरी मठाचे मठाधिपती महंत इच्छागिरी महाराज, श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांच्यासह अन्य महंत मंडळी यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. या घटनेचा तुळजापूर येथील सर्व महंत मंडळींनी निषेध केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महंत मावजीनाथ महाराज हे ‘अखिल भारतीय अवधूत भेष बारापंत महासभे’च्या संप्रदायातील श्री क्षेत्र तुळजापूर येथील ‘सिद्ध गरीबनाथ मठा’चे महंत (मठाधिपती) आहेत, तसेच शहरातील लोकांसाठी ते गुरुस्थानी आहेत. महंत मावजीनाथ महाराज हे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य, तसेच गोरक्षण-गोसेवा करतात. महंतांचे हे कार्य पहाता त्यांना वेळोवेळी जिल्हा न्यायालय येथे कायदेशीर प्रक्रियेसाठी यावे लागते. प्रदीप प्रभाकर मुंडे यांच्याकडून त्यांच्या जीवितास धोका आहे. तरी मुंडे यांच्यावर तात्काळ योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तुळजापूर शहर बंद ठेवण्यात येईल.

साधू-संतांना शिवीगाळ करणे योग्य नाही ! – महंत मावजीनाथ महाराज, गरीबनाथ मठाचे मठाधिपती, तुळजापूर

साधू-संतांना शिवीगाळ करणे योग्य नाही. महाराष्ट्रात साधू, संतांना अशा प्रकारे वागणूक दिली जात असल्यास सर्वसामान्य लोकांशी असे लोक कसे वागत असतील, याचा विचारही करू शकत नाही.


काय आहे प्रकरण ?

जिल्हा न्यायालयाच्या परिसरात प्रदीप मुंडे हे मोटरसायकलवर मागून येऊन जोरात ओरडले. त्याला महंत मावजीनाथ महाराज म्हणाले, ‘‘तुला आम्ही प्राणी दिसतो का ?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘होय तुम्ही गुराखी (जनावरांना चरायला नेणारे) आहात, चल तुला मारतो’’, असे म्हणून धमकी देत अंगावर आला आणि हात धरून न्यायालयाच्या परिसरातून अन्य ठिकाणी नेण्यासाठी ओढू लागला. तितक्यात परिसरातील पोलिसांनी मुंडे याला अडवले. (साधू-संतांवरील आक्रमणांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संशयित आरोपीवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)