|
मालवण – मालवण तालुक्यातील किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात गेल्या काही वर्षांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. स्थानिक शेतकर्यांनी या केंद्रासाठी विनामूल्य भूमी देऊनही या विज्ञान केंद्राच्या इमारतीचा अपवाद वगळता काहीही लाभ स्थानिकांना झालेला नाही, असा गंभीर आरोप मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य सुनील घाडीगांवकर यांनी आहे.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा १३ जानेवारी या दिवशी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत झाली.
या वेळी सदस्य घाडीगांवकर यांनी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राविषयी सांगितले की …
१. किर्लोस गावातील स्थानिक शेतकर्यांनी किर्लोस कृषी विज्ञान केंद्रासाठी विनामूल्य भूमी उपलब्ध करून दिली. या केंद्रात स्थानिक तरुणांना नोकर्या उपलब्ध करून देण्यात आल्या; मात्र गेल्या १५ ते २० वर्षांत हे कर्मचारी अल्प वेतनामध्ये काम करत आहेत. कृषी केंद्राची स्थानिक समिती कर्मचार्यांच्या वेतनातून ‘कमिशन’ लाटत असण्याची शक्यता आहे.
२. हे केंद्र ‘केंद्र शासना’च्या अखत्यारीत येत असल्याने याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मागणी करणार आहे.
३. स्थानिक शेतकर्यांसह परिसरातील शेतकर्यांना या केंद्राचा लाभ व्हावा, यासाठी शेतकर्यांनी काही एकर भूमी विनामूल्य दिली आहे; मात्र शेतकर्यांना हवातसा लाभ झालेला नाही.
४. कृषी विज्ञान केंद्राचे महाविद्यालय हे या केंद्राच्या परिसरात असणे आवश्यक असतांना ते सिंधुदुर्गनगरी येथील जैतापकर कॉलनी परिसरात नेण्यात आले. अन्य ठिकाणी महाविद्यालय न्यायचे होते, तर शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात विनामूल्य भूमी का घेण्यात आली. त्यामुळे शेतकर्यांची भूमी त्यांना परत करा.