बांधकाम विभागातील निविदा लिपिकाने दडपून ठेवल्या १३२ ‘फाईल्स’ !
संबंधित कारकूनाला बडतर्फच करायला हवे. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेचे हे चित्र पालटण्यासाठी कठोर शिक्षाच आवश्यक आहे.
पुणे – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील निविदा लिपिकाच्या कपाटावर घातलेल्या धाडीत १३२ कामांच्या मान्यतेसाठी सादर केलेले ‘एस्टिमेट’ (संभाव्य खर्च) लपवून ठेवल्याचे आढळून आले आहे. याव्यतिरिक्त ‘फायनान्शिअल बीड’ ओपन करतांना लघुत्तम निविदाधारकाला निरोप न पाठवता दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाच्या ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्याचा प्रकारही घडला आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आदेश दिल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी निविदा लिपिकाच्या कपाटाची पडताळणी केली. बांधकाम विभागातील या घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. उत्तर बांधकाम विभागामध्ये हा घोटाळा झाला असून कार्यकारी अभियंता पी.एस्. माने यांनी ‘टेंडर कारकून’ संजय मठ यांच्या कपाटाची अचानक पडताळणी केली. त्यानंतर लपवून ठेवलेल्या कामाच्या ‘फाईल्स’ ताब्यात देऊन संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेची १०० दिवसांत कामे पूर्ण करण्याची मोहीम चालू असतांना टेंडर कारकुनाने केलेल्या घोटाळ्यामुळे ती खंडित झाली आहे.