‘१.८.२०२० या दिवशी मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन त्यांच्याप्रती आर्तभावाने कृतज्ञता व्यक्त झाली. त्या वेळी ‘गुरुदेवांनी मला लहानपणापासून कसे सांभाळले ?’, याची आठवण होऊन मला पुढील प्रसंग आठवला अन् माझा भाव जागृत झाला. ‘मी ३ वर्षांची (वर्ष १९७५ मध्ये) असतांना माझ्या आजोळी सोनगीर (जिल्हा धुळे) येथे प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आले होते. त्यामुळे ‘भंडारा आणि त्यांचे भजन’, असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी माझ्या आजोबांनी आईला पत्र लिहून बोलावून घेतले होते. त्यामुळे आई मला सोनगीर येथे प.पू. बाबांच्या दर्शनाला घेऊन गेली. त्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. गर्दीतून वाट काढत आई मला घेऊन प.पू. बाबांच्या जवळ पोचली आणि तिने त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. त्यानंतर तिने माझेही डोके त्यांच्या चरणांवर टेकवले. प.पू. बाबांनी एवढी गर्दी असतांना माझ्या मस्तकावर हात ठेवला. सहा वर्षांपूर्वी हा प्रसंग सांगतांना आई मला म्हणाली, ‘‘तेव्हा प.पू. बाबा सगळ्यांच्याच मस्तकावर हात ठेवत नव्हते. त्या वेळी त्यांनी तुझ्याच डोक्यावर हात ठेवला; म्हणून तू आज सनातनची सेवा करत आहेस.’’ हे ऐकल्यावर माझी भावजागृती झाली आणि प.पू. बाबांनीच मला विष्णुरूपातील गुरुदेवांची सेवा करण्यासाठी अन् त्यांचे कार्य करण्यासाठी निवडले; म्हणून पुष्कळ कृतज्ञता वाटते.’
– सौ. निवेदिता जोशी (वय ४९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), नंदुरबार (२२.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |