गोंदिया येथे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार ! – संपादक
गोंदिया – तालुक्यातील मोरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून शासकीय महाविद्यालयात आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीसाठी ५० जणांचे नमुने पाठवण्यात आले होते; मात्र त्यातील ९ ते १० वर्षांच्या १४ मुलांचे वय निष्काळजीपणे १३० वर्षे नोंदवण्यात आले आहेत. काही चाचण्यांमध्ये ८ पुरुषांची महिला म्हणून नोंद करण्यात आली आहे, तसेच ८ जणांचा भ्रमणभाष क्रमांकही एकच नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराप्रती आरोग्य प्रशासन किती असंवेदनशील आहे, हेच यावरून दिसून येत आहे.
कोरोनासारख्या भयावह संक्रमणातही आरोग्य विभागाचा असा गलथानपणा आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा आहे. या सर्वच चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. यातील एकाही चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असता, तर आय.सी.एम्.आर्. पोर्टलवर भरलेली माहिती पालटता येत नसल्याने उपचारासाठी अडथळा आला असता. अशा प्रकारचा निष्काळजीपणा यापूर्वीही झाला असून कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.