सनातनचे संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) आणि पू. (सौ.) माला कुमार (वय ६७ वर्षे) यांच्या संदर्भात साधिकांना आलेल्या अनुभूती अन् त्यांचे संतपद घोषित होण्यापूर्वी साधिकेला मिळालेली पूर्वसूचना !

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार

फोंडा (गोवा) येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

१. अग्निहोत्राची सिद्धता करत असतांना वातावरणात अकस्मात् आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे आणि मन शांत अन् निर्विचार होणे

कु. श्रिया राजंदेकर

‘२३.१२.२०२१ या दिवशी संध्याकाळी मी घरी देवाजवळ अग्निहोत्र करण्याची सिद्धता करत होते. त्या वेळी मला अकस्मात् वातावरणात आनंदाची स्पंदने आणि लहरी प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले, तसेच माझे मन पुष्कळ शांत, निर्विचार अन् स्थिर झाले. त्या वेळी मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. अग्निहोत्राची सर्व सिद्धता करतांना माझ्या जवळपास कुणीही नव्हते. त्यामुळे ‘माझ्या मनाला काय जाणवत आहे ?’, हे मी घरात कुणाला सांगितले नव्हते.

२. एका भजनाच्या ओळी म्हणून झाल्यावर देहली येथील श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीवकुमार हे संतपदी विराजमान झाल्याचे समजणे

तेवढ्यात मला भजनातील ‘एकतारी संगे एकरूप झालो । आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।।’, या ओळी आठवल्या आणि मी आपोआपच या ओळी म्हणू लागले. त्या वेळी माझ्या आईने (सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी)) मला सांगितले, ‘‘अगं श्रिया, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकूंचा लघुसंदेश आला आहे, ‘आपले देहली येथील साधक श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार संतपदी विराजमान झाले.’’ काही दिवसांपूर्वी पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. सलग ४ दिवस भाववृद्धी सत्संगात माझी त्यांच्याशी भेट झाली होती. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी पुष्कळ जवळीक निर्माण झाली होती.

३. ‘आजपर्यंत कधीही न म्हटलेल्या भजनातील ओळींप्रमाणेच पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार एकत्रित संतपदी विराजमान झाले’, हे ऐकून आनंद होणे

त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘देवाने मला किती मोठी अनुभूती दिली आहे !’ आजपर्यंत मी हे भजन कधीच म्हटले नव्हते. मग आताच कसे हे म्हटले असेल ? ही तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे ना ! ‘एकतारी संगे एकरूप झालो । आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।।’, या ओळींप्रमाणेच पू. संजीव कुमारकाका आणि पू. (सौ.) माला कुमारकाकू एकत्रित संतपदी विराजमान झाले’, हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.

४. ‘देवाने काही दिवसांपूर्वीच मला त्या दोघांच्या सत्संगात रहाण्याची संधी दिली’, याबद्दल माझ्याकडून परात्पर गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– गुरुदेवांच्या चरणांवरील,

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), फोंडा, गोवा. (२६.१२.२०२१)

सौ. क्षिप्रा जुवेकर यांना पू. कुमार दांपत्याच्या संतत्वाविषयी मिळालेली पूर्वसूचना !

सौ. क्षिप्रा जुवेकर

१. पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या घरी पुष्कळ शांती आणि चैतन्य जाणवणे अन् त्यांच्याशी बोलल्यावर पुष्कळ आनंद वाटून झोप न येणे

‘९.१२.२०२१ ते ११.१२.२०२१ हे ३ दिवस मला पू. संजीव कुमार यांच्या देहली येथील घरी जाण्याची संधी मिळाली. ९.१२.२०२१ या दिवशी रात्री १०.३० वाजता मी त्यांच्या घरी पोचले. संपूर्ण दिवसभर प्रवास केल्यानंतरही मला थकवा जाणवत नव्हता. मला त्यांच्या घरी अतिशय शांती आणि चैतन्य जाणवत होते. अनेक वर्षांनंतर माझी पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली होती. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला इतका आनंद होत होता की, मला झोपच येत नव्हती.

२. अनुभूती

२ अ. अनेक दिवसांपासून माझे स्वभावदोष निर्मूलनाविषयीचे सारणी लिखाण झाले नव्हते. ते त्याच दिवशी लिहिण्यास आरंभ झाला.

२ आ. पू. संजीव कुमार यांच्यातील चैतन्यामुळे आध्यात्मिक उपाय करतांना ध्यान लागणे :

सकाळी पू. संजीव कुमार अग्निहोत्र आणि अन्य मंत्रपठण करत होते. ते त्या सेवेशी पूर्ण एकरूप झाले होते. थोड्या वेळानंतर मी आध्यात्मिक उपाय करण्यासाठी बसले असतांना माझे ध्यान लागले आणि माझी भावजागृतीही झाली. ‘हे सर्व पू. संजीव कुमार यांच्यातील चैतन्यामुळे झाले’, असे आता माझ्या लक्षात येत आहे.

२ इ. भावसत्संगाच्या संकलनाची सेवा अवघ्या दीड घंट्यात पूर्ण होणे, तेव्हा ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे घरात अस्तित्व आहे’, असे जाणवणे :

दुसर्‍या दिवशी आम्ही त्यांच्या घरी भावसत्संगाच्या संकलनाची सेवा करत होतो. या सेवेसाठी नेहमी ३ घंटे लागतात; परंतु त्या दिवशी केवळ १.३० घंट्यातच ही सेवा पूर्ण झाली. तेव्हा मला अत्यंत आश्चर्य वाटले आणि जाणवले की, ‘येथे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अस्तित्व आहे.’

३. पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या घरात रामनाथी आश्रमाप्रमाणे चैतन्य जाणवणे

‘पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) मालाकुमार यांचे घर म्हणजे जणू काही रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमच आहे. त्यांची खोली साक्षात् परात्पर गुरुदेवांचीच खोली आहे. आपत्काळ किंवा अनिष्ट शक्ती त्यांच्या घराचा उंबरठाही ओलांडू शकत नाहीत, एवढे चैतन्य त्यांच्या घरात आहे’, असे मला जाणवले.

४. पू. (सौ.) मालाकुमार यांची त्वचा मुलायम आणि मऊ असल्याचे जाणवणे

मला पू. (सौ.) मालाकुमार यांचे हात बघण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘त्यांची त्वचा संतांच्या त्वचेसारखी मऊ आणि मुलायम आहे’, असे मला वाटले. मी त्यांना तसे बोलूनही दाखवले .

५. ‘पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार संत झाले असतील’, असा विचार मनात येणे

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. या वेळी आम्हाला त्यांच्याकडून पुष्कळच प्रीती अनुभवता आली. तेव्हा ‘ते संत झाले असतील’, असा विचार माझ्या मनात आला.

श्री गुरुकृपेने मला हे सर्व अनुभवता आले आणि अशा संतरत्नांच्या सत्संगाचा लाभ झाला. त्यांच्या या कृपेसाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे.’

– सौ. क्षिप्रा जुवेकर, (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) देहली (२३.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद्गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक