कुटुंबातील २ प्रमुख व्यक्तींचा अपघात होऊन त्यात एकाचे निधन आणि एक जण अतीदक्षता विभागात असतांनाही व्यष्टी साधनेचा आढावा वेळेत पाठवणारे श्री. राजेंद्र दिवेकर, सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर आणि श्री. किशोर दिवेकर !

‘साधकांनो, व्यष्टी साधनेचे असे गांभीर्य स्वतःत निर्माण करा !’ – सद्गुरु राजेंद्र शिंदे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात मूळचे करोटी, वरसई येथे एकत्र कुटुंबात रहाणारे श्री. राजेंद्र दिवेकर, त्यांची पत्नी सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर आणि श्री. किशोर दिवेकर (श्री. राजेंद्र यांचे चुलतभाऊ) हे पूर्णवेळ साधना करतात. २७.१२.२०२१ या दिवशी श्री. राजेंद्र आणि श्री. किशोर या दोघांचे वडील (अनुक्रमे अनंत दिवेकर आणि हरिभाऊ दिवेकर) दुचाकीवरून जात असतांना मोठा अपघात झाला. त्यात श्री. राजेंद्र यांच्या वडिलांचे २७.१२.२०२१ या दिवशी दुपारी दीड वाजता अपघातस्थळीच निधन झाले, तर श्री. किशोर यांचे वडील अत्यवस्थ असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती केले होते.

श्री. राजेंद्र दिवेकर
सौ. नम्रता दिवेकर
श्री. किशोर दिवेकर

१. वडिलांचे अपघातात निधन झाल्यावरही स्थिर राहून पुढील सर्व प्रक्रिया करून वडिलांचे अंत्यविधी झाल्यावर काकांच्या सेवेसाठी रुग्णालयात जाणारे श्री. राजेंद्र दिवेकर !

या अपघाताच्या वेळी श्री. राजेंद्र दिवेकर, सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर आणि श्री. किशोर दिवेकर देवद येथील सनातनच्या आश्रमात होते. अपघाताचे वृत्त समजताच ते दुपारी २.३० वाजता आश्रमातून करोटी, वरसई (तालुका पेण) येथे त्यांच्या घरी जायला निघाले. हा मोठा अपघात झाला असल्याने पोलीस पंचनामा, रुग्णालयातील तपासणी आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया आदी गोष्टी पूर्ण होऊन रात्री ७ वाजता श्री. राजेंद्र यांच्या वडिलांचे अंत्यविधी झाले. त्यानंतर श्री. राजेंद्र त्यांच्या काकांना (श्री. किशोर यांच्या वडिलांना) भरती केलेल्या रुग्णालयात श्री. किशोर यांच्या साहाय्यासाठी गेले.

२. अपघातामुळे वडिलांची स्थिती अतिशय गंभीर असतांनाही डगमगून न जाता त्यांच्या समवेत रुग्णालयात थांबणारे श्री. किशोर दिवेकर !

२७.१२.२०२१ या दिवशी दुपारपासून २८.१२.२०२१ या दिवशी सकाळपर्यंत श्री. किशोर यांचे वडील (हरिभाऊ) रुग्णालयात अतीदक्षता विभागात होते. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. श्री. किशोर यांच्या वडिलांचे २८.१२.२०२१ या दिवशी सकाळी १०.१५ वाजता निधन झाले. या पूर्ण कालावधीत श्री. किशोर रुग्णालयातच होते. दुपारी ३ वाजता हरिभाऊ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

३. अत्यंत शोकाकुल वातावरणात घरातील परिस्थिती स्थिरतेने हाताळणार्‍या सौ. नम्रता दिवेकर !

दिवेकर यांचे घर खेडेगावात असून त्यांचे एकत्र कुटुंब आहे. घरातील दोन प्रमुख व्यक्तींचे एकाच वेळी निधन झाल्याने घरी शोकाकुल वातावरण होते. त्यांच्या घराजवळच त्यांच्या नातेवाइकांची घरे असल्याने त्यांच्या घरी अनेक जणांचे येणे-जाणे चालू होते. त्या वेळी सौ. नम्रता दिवेकर घरी राहून घरातील परिस्थिती स्थिरतेने हाताळत होत्या.

४. अतिशय गंभीर अन् प्रतिकूल परिस्थितीतही व्यष्टी साधनेचा आढावा वेळेत पाठवणारे श्री. राजेंद्र, सौ. नम्रता आणि श्री. किशोर !

अत्यंत शोकाकुल वातावरण, धावपळ आणि व्यस्तता असतांनाही श्री. राजेंद्र, सौ. नम्रता आणि श्री. किशोर यांनी त्यांचा व्यष्टी साधनेचा २७.१२.२०२१ या दिवसाचा आढावा २८.१२.२०२१ या दिवशी सकाळी ९.३० वाजण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विस्तृत स्वरूपात वेळेत लिहून पाठवला. यातून ‘त्यांच्यात व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि तळमळ किती आहे !’, हे लक्षात येते.

साधकांनो, स्वतःमध्ये असे व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण करा !’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०२१)

प्रतिकूल प्रसंगात गुरुदेवांनी फुलासारखे सांभाळल्यामुळे दिवेकर कुटुंबियांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘गुरुदेवा, आम्हा कुटुंबियांवर इतका मोठा प्रसंग प्रथमच ओढवला. असे असतांनाही तुम्ही आम्हा सर्वांना अगदी फुलासारखे सांभाळलेत. तुम्ही आम्हाला कोणतीही झळ पोचू दिली नाहीत. या प्रसंगाला सामोरे जाण्याची आमची क्षमताच नव्हती. तुम्हीच आमचे रक्षण केलेत, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. साधक, जवळचे नातेवाईक, तसेच राजकीय क्षेत्रातील काही मंडळी यांनीही आम्हाला या प्रसंगात पुष्कळ सहकार्य केले. ‘गुरुदेवा, त्यांच्या माध्यमातून तुम्हीच आमची काळजी घेतलीत’, असे आम्हाला वाटले. ‘प्रतिकूल काळात साधनाच आपल्याला तारून नेते’, हे आतापर्यंत ऐकले, वाचले होते. या मोठ्या संकटकाळात आम्ही ते अनुभवले. तुम्ही आम्हा कुटुंबियांवर केलेल्या अपार कृपेसाठी कोटीशः कृतज्ञता !’ – दिवेकर कुटुंबीय (३१.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक