CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !

जंतरमंतरवरील आंदोलन आणि मेजवानी यांचा खर्च कुणी केला ?, हे समोर आले पाहिजे ! - अधिवक्ता महेश जेठमलानी यांची मागणी

नवी देहली – जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाच्या अनेक दिवस चाललेल्या निदर्शनांनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर या विजयाचा आनंद म्हणून आता कॉकरोच जनता पक्षाचा पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी करतांनाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत असून तिथे नाच-गाणेही चालू आहे. हा व्हिडिओ वरिष्ठ अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे. त्यांनी यावरून प्रश्न उपस्थित करतांना म्हटले की, कॉकरोच जनता पक्षाच्या जंतरमंतर येथील आंदोलनाचा खर्च कुणी केला ? प्रवास, जेवण आणि रहाण्याचा खर्च, तसेच या मेजवानीचाही खर्च कुणी केला? या पक्षाच्या मागे कोण आहे ?, यांचा शोध घेतला पाहिजे.

आत्महत्येवरून आंदोलन करणारे जल्लोष करत आहेत ! – भाजपचे नेते अमित मालवीय

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी पोस्ट करत म्हटले की, प्रत्येकाला कष्टांनंतर विश्रांती घेण्याचा आणि जल्लोष करण्याचा अधिकार आहे; परंतु त्यासाठी वेळ अन् ठिकाण यांनाही महत्त्व असते. जेव्हा एखादे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी न्यायाची लढाई म्हणून केले जाते आणि ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा उल्लेख त्याचा नैतिक पाया म्हणून केला जातो, तेव्हा त्यानंतर लगेचच जल्लोष करण्यासारखी दृश्ये अनेक लोकांना संवेदनशीलतेचा अभाव असलेली वाटू शकतात.

संपादकीय भूमिका

कुणी काय करावे ?, हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असला, तरी ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटणे आणि त्यामुळे २१ विद्यार्थ्यांची आत्महत्या करणे, यांवरून आंदोलन करणारे आंदोलनात मिळालेला विजय अशा प्रकारे साजरा करत असतील, तर ते नैतिक आणि संयुक्तिक आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होतो !