आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार

  • ख्रिस्ती ओळख लपवून लग्न केल्याचा आरोप

  • देवाजवळ लावलेल्या उदबत्तीच्या सुगंधाची मृतदेहाच्या दुर्गंधाशी तुलना

जोगी रमेश (डावीकडे)

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशाचे माजी मंत्री आणि वाय.एस्.आर्. काँग्रेस (युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस – युवा, कामगार आणि शेतकरी काँग्रेस) पक्षाचे वरिष्ठ नेते जोगी रमेश अन् त्यांचे कुटुंब यांच्यावर त्यांची सून मेघना हिने हुंड्यासाठी छळ करणे, मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचार या आरोपांवरून तक्रार प्रविष्ट केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीत मेघना यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, विवाह ठरतांना जोगी रमेश यांच्या कुटुंबाने स्वतः हिंदु कुटुंब असल्याचे सांगितले होते आणि लग्नही हिंदु प्रथा-परंपरानुसारच झाले होते; परंतु सासरी पोचल्यानंतर हळूहळू जाणीव झाली की, हे कुटुंब प्रत्यक्षात ख्रिस्ती आहे. ही माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली गेली. ही एक मोठी फसवणूक होती. एकदा मी घरात पूजा करत असतांना देवापुढे उदबत्ती लावली, तेव्हा सासरची मंडळी संतापली. त्यांनी उदबत्तीच्या सुवासाची चेष्टा केली आणि त्याची तुलना मृतदेहातून येणार्‍या दुर्गंधीशी केली. मी यास विरोध केल्यावर मला धमकावण्यात आले आणि घरच्या गोष्टी किंवा धर्माशी संबंधित सत्य माहेरच्यांना सांगू नको, अशी चेतावणी देण्यात आली. मी गप्प न बसल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही त्यांचा आरोप आहे.

पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाचे निष्पक्ष अन्वेषण केला जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

  • ‘आंध्रप्रदेशातील जवळपास २५ टक्क्यांहून अधिक हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून ते सार्वजनिकरित्या ही गोष्ट लपवून ठेवत आहेत’, असा दावा यापूर्वीच करण्यात आला होता. तो या घटनेतून सत्य आहे, असेच दिसून येत आहे !
  • वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डीही ख्रिस्ती आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेते ख्रिस्ती असतील, असे कुणी म्हणत असेल, तर चुकीचे ठरू नये !