E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना

  • इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाला विरोध

  • केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या त्यागपत्राची मागणी

नवी देहली – कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता  सामाजिक माध्यमांवर ‘ई २० जनता पक्ष’ नावाचा एक गट सिद्ध करण्यात आला आहे. ‘इथेनॉल’मिश्रित इंधनासमवेत १०० टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळावा, या मागणीकरता या गटाची स्थापना करण्यात आली आहे. हा गट कुणी निर्माण केला ?, याचा संस्थापक कोण आहे ?, हे समजू शकलेले नाही; मात्र सरकारने लागू केलेल्या इथेनॉल मिश्रण धोरणामुळे या गटाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे.

या गटाने म्हटले आहे की, आम्ही कोणतेही अनुदान, विनामूल्य इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी करत नाही आहोत. ग्राहकांना जे इंधन हवे आहे, ते खरेदी करण्याचा पर्याय त्यांना मिळावा, एवढीच आमची मागणी आहे.

इथेनॉल-मुक्त इंधन मिळणे झाले कठीण !

सध्या भारतात इथेनॉल-मुक्त इंधन उपलब्ध आहे; परंतु ते केवळ काही निवडक पेट्रोल पंपांवरच मिळते आणि त्याची किंमत फार अधिक आहे. देहलीमध्ये सामान्य ‘इ २०’ पेट्रोलची किंमत अनुमाने १०२.१२ रुपये प्रति लीटर आहे, तिथे हे प्रीमियम इंधन अनुमाने १६९ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. यामुळे ते सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. दुसरीकडे सरकारने मात्र इथेनॉल मिश्रित इंधनामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

आता हिंदूंनीही देशव्यापी, गोहत्या बंदी, धर्मांतरविरोधी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, देशव्यापी समान नागरी कायदा, देशाला हिंदु राष्ट्र घोषित करणे आदींसाठी अशा प्रकारचे ‘जनता पक्ष’ स्थापन करून आंदोलन करून सरकारला हे करण्यास भाग पाडावे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे ठरू नये;  कारण सरकार हिंदूंना गृहीत धरते, तर जंतरमंतर सारख्या आंदोलनाला प्रतिसाद देते, असेच वाटते !