कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !

स्थानिक भक्त अणि पुजारी यांच्या समवेत स्थळवृक्षाला (पिंपळाला) पाणी घालतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

कांचीपूरम् (तमिळनाडू) – येथील ब्रह्मदेशम् गावातील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे (पिंपळाचे) रोपण २६ ऑगस्ट २०२६ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्थळवृक्षाची पूजा करून आरती केली. तत्पूर्वी मंदिरातील पुजार्‍यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून या पूजेचा संकल्प करून घेतला. श्री कल्याण वरद मंदिर हे श्रीविष्णूचे मंदिर असून या वेळी स्थानिक भक्त आणि महिला यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत विष्णुसहस्रनामाचे पठण केले. यानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उपस्थितांना स्थळवृक्षाविषयी मार्गदर्शन केले. कल्याण वरद मंदिराचा कुंभाभिषेक २३ ऑगस्ट या दिवशी आहे, त्याचेही निमंत्रण श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. विनायक शानभाग हेही उपस्थित होते.

स्थळवृक्ष श्रीविष्णूचे प्रतीक ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्हणाल्या, ‘‘स्थळरूपी पिंपळ हे श्रीविष्णूचे प्रतीक आहे. या वृक्षामध्ये ब्रह्मांडातील विष्णूचे चैतन्य विद्यमान आहे. गर्भगृहातील श्रीविष्णु मूर्तीतील चैतन्य सर्वत्र पसरवण्याचे कार्य स्थळवृक्ष करत असतो. यामुळे आपोआपच मंदिर परिसरही देवतेच्या चैतन्याने भारित होतो. स्थळावृक्षाला प्रार्थना केल्यास ‘निसर्गदेवो भव ।’, याप्रमाणे गर्भागृहातील देवतेच्या मूर्तीतील शक्तीचा आपल्याला लाभ होतो. एवढे स्थळवृक्षाचे महत्त्व आहे. ‘या पिंपळ वृक्षातील चैतन्य आपल्या सर्वांना मिळो’, अशी श्री कल्याण वरद विष्णूच्या चरणी प्रार्थना !’’