घरोघरी आयुर्वेद
पूर्वी घराघरांत रक्तचंदनाची बाहुली असायची. आता नावालाही ती दुर्लभ झाली आहे ! सध्या तर बहुतांश रुग्णांकडे ती नसतेच. रक्तचंदनाची बाहुली पुष्कळ उपयुक्त आणि बहुगुणी औषध असल्याने पूर्वी प्रत्येक घरात ती आवर्जून ठेवली जायची. त्याचे काही महत्त्वाचे उपयोग पुढीलप्रमाणे असून वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन मगच उपचार घ्यावेत.
१. मुका मार लागला, रक्त साकळलेले असले की, गरम लेप लावणे.
२. डोळ्यांमध्ये रांजणवाडी अथवा अंजुर्लीसारखे विकार झाल्यास लेप लावणे.
३. गळू झाल्यावर ते फुटावे वा नष्ट व्हावे; म्हणून दोषस्थितीनुसार गरम वा थंड लेप लावणे.
४. नागिणीसारख्या विकारात लेप लावण्यास आणि पोटात घेण्यास (पिण्यासाठी) उपयुक्त आहे.
५. किडा चावल्याने आलेली सूज उतरावी म्हणून लेप लावण्यासाठी आणि पोटात घेण्यास उपयुक्त आहे.
६. त्वचा विकारांवर उपयुक्त आहे.
७. उत्कृष्ट विषशामक असल्याने अन्नातून विषबाधा झालेली असल्यासही पोटात घेण्यास उपयुक्त आहे.
८. उलटी, पक्वातिसार (अतीसाराचा एक प्रकार) यांना थांबवण्यासाठी लाभदायक आहे.
९. ‘फ्रॅक्चर’ (अस्थिभंग) लवकर भरून येण्यास वा भाजले असल्यास बाहेरून लावण्यास उपयुक्त आहे.
१०. श्वसनक सन्निपातातील (श्वसन संस्थेचा एक गंभीर आजार) ‘वास न येणे’ या लक्षणावर लाभदायक आहे.
रक्तचंदनाची बाहुली हे बहुगुणी औषध असल्याने आपल्याला घरात ते कायम सापडेल, असे ठेवा.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.