सतत इतरांना साहाय्य करणारे आणि देवाप्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अनंत दिवेकर (वय ६७ वर्षे) !

‘२७.१२.२०२१ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधक श्री. राजेंद्र दिवेकर यांचे वडील अनंत दिवेकर आणि काका हरिभाऊ दिवेकर यांचा भीषण अपघात झाला. त्यात अनंत दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर हरिभाऊ दिवेकर यांचे २८.१२.२०२१ या दिवशी निधन झाले. दोघांचा अपघात झाल्याचे समजल्यावर प्रथम सर्वांना धक्का बसला; पण अगदी अल्प कालावधीत सर्वांनाच जाणवले, ‘आपल्याला स्थिर राहूनच या प्रसंगाला सामोरे जायचे आहे.’ ५.१.२०२२ या दिवशी अनंत दिवेकर यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कै. अनंत दिवेकर

१. जाणवलेली सूत्रे

१ अ. श्रीमती निर्मला दिवेकर (कै. अनंत दिवेकर यांची पत्नी), करोटी (ता. पेण, जिल्हा रायगड)

श्रीमती निर्मला दिवेकर

१. यजमानांच्या निधनाचा प्रसंग देवाची इच्छा म्हणून स्वीकारता येणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच सांभाळणार आहेत’, असे जाणवणे : ‘यजमानांचे निधन झाल्याचे समजल्यावर मला प्रथम पुष्कळ धक्का बसला आणि अश्रू अनावर झाले. काही वेळानंतर यजमानांच्या निधनाचा प्रसंग मला देवाची इच्छा म्हणून स्वीकारता आला. आता ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच मला सांभाळणार आहेत’, असे मला वाटते.

२. ‘यजमान आणि दीर या दोघांचे निधन झाले नसून ते सेवेलाच गेले आहेत’, असे मला वाटते.’ 

१ आ. श्री. संतोष दिवेकर (ज्येष्ठ पुत्र), पेण, जिल्हा रायगड 

वडिलांच्या अपघाताचे वृत्त समजल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बळ दिल्याने स्थिर रहाता येणे : ‘वडिलांच्या अपघाताचे वृत्त समजल्यावर माझ्याकडून ‘गुरुदेवा’ असा धावा झाला. प्रत्यक्षात माझा स्वभाव भावनिक आहे. त्यामुळे इतक्या कठीण प्रसंगात मी कोलमडून गेलो असतो; पण गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला स्थिर रहाता आले आणि घरच्यांनाही सर्व परिस्थिती समजावून सांगता आली. गुरुदेवांनीच मला हे बळ दिले.’

१ इ. सौ. दीपाली दिवेकर (थोरली सून), पेण, जिल्हा रायगड.

सौ. दीपाली दिवेकर

१. गुरुस्मरण (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण) होऊन अनुसंधान साधले जाणे : ‘अपघाताचे वृत्त समजल्यावर मी यजमानांच्या समवेत सासरे आणि चुलत सासरे यांना पहाण्यासाठी गेले. सासर्‍यांचा मृतदेह पाहून आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी माझी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना होऊ लागली आणि ‘आता काय करायचे ?’, या दृष्टीने माझी विचारप्रक्रिया चालू झाली. त्या वेळी चुलत सासर्‍यांना ज्या रुग्णालयात भरती केले होते, तेथील आधुनिक वैद्यांनी विचारलेल्या काही सूत्रांविषयी मला निर्णय द्यावा लागणार होता. त्या वेळी गुरुस्मरण होऊन अनुसंधान साधले जात असल्याने साधना म्हणून प्रत्येक निर्णय देणे मला शक्य झाले.

२. ‘प्रार्थना आणि अनुसंधान’ यांमुळे प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाता येणे : पुढील सर्व प्रसंगांत माझी सतत ‘गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असे होऊ दे’, अशी प्रार्थना होत होती. ‘प्रार्थना आणि अनुसंधान’ यांमुळे भावनाशील न होता प्रत्येक प्रसंग मला स्थिर राहून हाताळता आला.’

१ ई. श्री. राजेंद्र दिवेकर (कनिष्ठ पुत्र), सनातन आश्रम, देवद, पनवेल. 

१. वडिलांचे निधन झाल्याचे समजल्यावर ‘श्रीकृष्णाने पुढील परिस्थिती हाताळण्यासाठी शक्ती दिली’, असे जाणवणे : ‘मला वडिलांच्या अपघाताचे वृत्त समजले, तेव्हा मी आश्रमात होतो. मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले. त्या वेळी ‘त्यानेच मला पुढील परिस्थिती हाताळण्यासाठी शक्ती दिली आहे’, असे मला जाणवले. माझे आतून गुरुस्मरणही होऊ लागले. आश्रमातून घरी जात असतांना संपूर्ण प्रवासात मी स्थिर होतो.

२. अंत्यविधीची सिद्धता करतांना तेथील वातावरण सात्त्विक जाणवणे आणि दुःखी मानसिकतेत न रहाता वडील अन् काका यांचे गुण आठवून प्रेरणा मिळणे : पहिल्या दिवशी वडिलांचे आणि दुसर्‍या दिवशी काकांचे अंत्यविधी करण्यात आले. दोन्ही दिवशी अंत्यविधीची सिद्धता करतांना मला तेथील वातावरण सात्त्विक जाणवत होते. मी दुःखी मानसिकतेत न रहाता वडील आणि काका यांचे गुण आठवून मला प्रेरणा मिळत होती.’

१ उ. सौ. नम्रता दिवेकर (धाकटी सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल. 

‘कुटुंबियांना कसे हाताळायचे’, असे वाटून ताण येणे आणि गुरुपादुकांचे स्मरण करून त्यांना आळवल्यावर मन स्थिर होणे : ‘आश्रमातून घरी जात असतांना ‘कुटुंबीय या प्रसंगाला कसे सामोरे जातील ? त्यांना कसे हाताळायचे ?’, असे वाटून मला क्षणभर थोडा ताण आला. त्याच वेळी मला गुरुपादुकांचे स्मरण झाले. त्यांना आर्ततेने आळवल्यावर माझे मन स्थिर झाले. ‘परात्पर गुरुदेवच सर्वांची काळजी घेत आहेत’, असे मला आतून जाणवले. प्रत्यक्षातही सासरे आणि चुलत सासरे यांच्या निधनानंतर मला तसेच अनुभवता आले.’

१ ऊ. सौ. रंजना जानिरे (कै. अनंत दिवेकर यांची कन्या), लोणावळा, पुणे

१. ‘घरातील वातावरण देवाच्या कृपेने स्थिर होते.

२. माझा आतून दत्त आणि श्रीकृष्ण यांचा जप चालू होता. त्यामुळे मी काही प्रमाणात स्थिर राहू शकले.’

२. गुणवैशिष्ट्ये

श्री. संतोष दिवेकर

२ अ. धार्मिकतेची आवड : ‘आमचे बाबा घरातील कुलदेव, मारुती मंदिरातील मारुतीची आणि ग्रामदेवता यांची पूजा प्रतिदिन २ घंटे करायचे. यात कधीही खंड पडला नाही.

२ आ. बाबांना गावावर येणार्‍या संकटाची पूर्वसूचना मिळणे : ग्रामदेवता बाबांना कौल द्यायची. गावावर काही अरिष्ट येणार असल्यास त्याची बाबांना पूर्वसूचना मिळायची. एकदा गावात एक हिंस्र प्राणी येणार असल्याचे बाबांना तो गावात येण्याच्या २ दिवस आधीच समजले. बाबांनी आधीच उपाययोजना केल्याने त्या प्राण्यापासून गावातील लोकांचे रक्षण झाले.

२ इ. प.पू. भक्तराज महाराज यांनी बाबांना ‘तुझ्या घरी कायम वास्तव्याला येणार आहे’, असा आशीर्वाद देणे आणि कुटुंबीय अन् साधक यांना घरात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवणे : कांदळी येथे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या आश्रमात एकदा रामनवमी उत्सवाच्या वेळी बाबा सेवेसाठी गेले होते. उत्सव संपवून घरी येत असतांना बाबा प.पू. बाबांना नमस्कार करण्यासाठी गेले. त्या वेळी प.पू. बाबा झोपलेले असल्याने बाबांनी त्यांना केवळ नमस्कार केला. इतक्यात प.पू. बाबा उठले आणि त्यांनी बाबांच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देत त्यांना सांगितले, ‘‘मी तुझ्या घरी कायम वास्तव्याला येणार आहे.’’ प्रत्यक्षातही आम्हाला आणि आमच्या घरी येणार्‍या साधकांनाही घरात प.पू. बाबांचे अस्तित्व जाणवते, तर काहींना त्यांचे दर्शनही होते.

२ ई. स्वतःच्या पदाचा अपलाभ न घेता सर्वांना निरपेक्षपणे साहाय्य करणे : आमची आर्थिक स्थिती सामान्य होती. बाबा गावचे पोलीस पाटील होते; मात्र त्यांनी कधीही पदाचा अपलाभ घेऊन लोकांकडून पैसे घेतले नाहीत. त्यांनी अनेक ठिकाणी स्वखर्चाने जाऊन निरपराध लोकांना सोडवले होते. ते वेळप्रसंगी घरची कामे सोडून इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करायचे. त्यामुळे पोलीसही बाबांना मानायचे. पोलिसांना त्यांच्याविषयी विश्वास वाटत असे.

२ उ. प्रामाणिकपणा

१. एकदा बाबांना मार्गात काही सहस्र रुपये असलेली पिशवी मिळाली. तेव्हा ‘कुणाचे तरी ते चुकून पडले असतील’, या विचाराने बाबा तेथेच बसून राहिले. काही घंट्यांनी संबंधित व्यक्ती तेथे आल्यावर बाबांनी निश्चिती करून ती पिशवी तिच्याकडे दिली.

२. एकदा एका नातेवाइकांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचा हार त्यांनी आमच्या घरी पाठवलेल्या साहित्यात चुकून आला होता. त्या नातेवाईकांना याची कल्पना नव्हती. काही दिवसांनी बाबांना हार त्या साहित्यात दिसल्यावर त्यांनी नातेवाईकांना हार परत नेऊन दिला.

२ ऊ. सहजता : बाबांच्या सहज आणि आपुलकीयुक्त वागण्या-बोलण्यामुळे त्यांनी समाजातील पुष्कळ लोकांना जोडून ठेवले होते. गावात येणारे-जाणारे बहुतेक लोक त्यांना भेटल्याविना जात नसत.

२ ए. भाऊ कामानिमित्त बाहेरगावी असतांना ‘त्यांची पत्नी आणि मुले’ यांचे प्रेमाने करणे : आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे घरातील सर्व व्यवहार बाबा आणि आमचे काका (कै. हरिभाऊ दिवेकर) करायचे. त्यात त्यांनी ‘माझे-तुझे’, असे कधीही केले नाही किंवा ‘कोणत्याही कारणावरून त्यांचे कधी भांडण झाले’, असे कधीच झाले नाही. काका कामानिमित्त अधिक काळ बाहेरगावी असत. तेव्हा त्यांची पत्नी आणि ३ मुले यांनाही बाबांनी पुष्कळ प्रेम देऊन त्यांची काळजी घेतली.

२ ऐ. गावातील नदीला आलेल्या पुरात वाहून जाणार्‍या लोकांना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वाचवणे : एकदा पावसाळ्यात गावातील नदीची पाणी पातळी वाढल्याने काही लोक वाहून जात होते. बाबांना हे समजल्यावर त्यांनी तत्परतेने धावत जाऊन पुराच्या पाण्यात उडी टाकून वाहून जाणार्‍या अनेक लोकांना वाचवले. त्यांनी स्वतःच्या जिवाची कधीच पर्वा केली नाही.

२ ओ. मुलगा पूर्णवेळ साधना करत असतांना ‘मुलाला देवाच्या चरणी अर्पण केले आहे’, असा भाव असणे : मी (श्री. राजेंद्र) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करू लागलो. तेव्हा आमचे काही नातेवाईक बाबांना सांगायचे, ‘‘राजेंद्रला नोकरी करायला सांगा.’’ तेव्हा बाबा त्यांना सांगायचे, ‘‘मी मुलाला देवाच्या चरणी अर्पण केले आहे.’’ त्यांचा हा विचार म्हणजे धर्मकार्यासाठी मोठा त्यागच आहे.

२ औ. श्रद्धा : एकदा एका प्रकरणात पोलिसांनी बाबांना विनाकारण ३ दिवस त्यांच्या समवेत ठेवले; मात्र पोलिसांनी त्यांची योग्य ती काळजी घेतली. तेव्हा बाबा स्थिर होते. त्यांना जराही भीती वाटत नव्हती. त्यांचा सुस्वभाव आणि साधेपणा पाहून पोलिसांनी त्यांना सोडून दिले. तेव्हा ‘प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच पोलिसांनी काही त्रास दिला नाही’, याची जाणीव होऊन बाबांची प.पू. भक्तराज महाराज अन् परात्पर गुरुदेव यांच्याप्रती असणारी श्रद्धा आणखी दृढ झाली.’

 

– श्री. संतोष दिवेकर (मोठा मुलगा), पेण, जिल्हा रायगड; श्री. राजेंद्र दिवेकर (लहान मुलगा), सनातन आश्रम, देवद, पनवेल आणि सौ. रंजना जानिरे (मुलगी)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक