सेवेची तळमळ आणि शिकण्याची आवड असणारे श्री. लक्ष्मण कृष्णा सावंत !

सेवेची तळमळ आणि शिकण्याची आवड असणारे पनवेल (जिल्हा रायगड) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. लक्ष्मण कृष्णा सावंत (वय ७९ वर्षे) !

श्री. लक्ष्मण कृष्णा सावंत

१. शिकण्याची आवड आणि सेवेतील चिकाटी

अ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेविषयी काकांना काही माहिती नसूनही या वयातही त्यांनी सेवेला आरंभ केला. काकांची सेवेविषयीची तळमळ आणि चिकाटी वाढली आहे.

आ. एकदा काकांनी श्री. उथळे यांना सुतळीची गुंडी करतांना पाहिले. काकांनी ते शिकून घेतले आणि सुतळीची तशीच गुंडी बनवली.’
– सौ. अश्विनी परब, खांदा कॉलनी, पनवेल (७.५.२०१८)

इ. ‘सावंतआजोबा केंद्रात आकाशकंदिल बनवण्याच्या सेवेला एकदा आले होते. त्या वेळी त्यांच्याकडून कागद चिकटवतांना कागदाला खळ अधिक लागल्यामुळे आकाशकंदिल बनवण्यात चूक झाली. सहसाधकांनी त्यांना योग्य पद्धत सांगितल्यावर त्यांनी ती लगेच आत्मसात केली आणि ती सेवा चिकाटीने शिकून घेतली.’
– कु. प्रियांका परब, खांदा कॉलनी, पनवेल (७.५.२०१८)

२. सेवेची तळमळ

अ. ‘काका घरातील सदस्यांना घरकामात साहाय्य करतात आणि वेळ काढून सेवेला येतात.

आ. सेवेसाठी साधक अल्प असल्यास साहाय्यासाठी काकांना संपर्क करून विचारल्यावर ते लगेच सेवेला येतात. कधी साधकांनी काकांना सेवेला येण्याचा निरोप दिला नाही, तर ते स्वत:हून साधकांना संपर्क करून विचारतात आणि सेवेला येतात.

इ. प्रतिदिन दुपारी काका सेवेला येतात आणि सायंकाळी ५ वाजता घरी जायला निघतात. काही वेळा सेवा अधिक असेल आणि ती त्याच दिवशी पूर्ण करण्याचे साधकांनी ठरवले असेल, तर काका सेवेसाठी थांबतात आणि सेवा पूर्ण करूनच घरी जातात.

ई. सेवा झाल्यावर काका तेथील आवराआवर करून, घेतलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवून आणि सर्व साधकांना नमस्कार करून मगच घरी जातात.’
– सौ. अश्विनी परब, खांदा कॉलनी, पनवेल (७.५.२०१८)

उ. ‘एकच मूत्रपिंड असूनही सेवेची तळमळ आणि गुरूंप्रतीचा भाव यांमुळे उत्साहाने सेवा करणे : ‘सावंतआजोबांच्या मोठ्या मुलाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. आजोबांनी त्यांचे एक मूत्रपिंड मुलाला दिले; परंतु प्रत्यारोपण यशस्वी झाले नाही आणि त्यांच्या मुलाचे निधन झाले. एवढ्या कठीण प्रसंगातूनही आजोबांनी स्वत:ला सावरले आणि सेवेला आरंभ केला. एकच मूत्रपिंड असूनही या वयात असलेला काकांचा सेवेचा उत्साह पाहून त्यांच्यातील सेवेची तळमळ आणि गुरूंप्रतीचा भाव दिसून येतो.’
– कु. ज्योत्स्ना मनवळ, सौ. अश्विनी परब आणि सौ. योगिता सावंत (१०.५.२०१८)

३. इतरांना साहाय्य करणे

अ. ‘टपालाद्वारे (पोस्टाने) साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ पाठवतांना त्याची विशिष्ट प्रकारे घडी घालावी लागते. मला साप्ताहिकाची घडी घालता येत नव्हती; म्हणून मी घड्या घातलेल्या साप्ताहिकाच्या अंकांवर पत्ते चिकटवण्याची सेवा करू लागले. हे काकांच्या लक्षात आले आणि ‘तुम्ही घडी घालायला घ्या, मी सांगतो कशी घडी घालायची ते’, असे म्हणून त्यांनी मला लगेच साप्ताहिकाची घडी घालायला शिकवले.’
– सौ. जयश्री मनवळ, खांदा कॉलनी, पनवेल (९.५.२०१८)

४. ‘श्री. सावंतकाकांमध्ये सहनशीलता आणि प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती आहे. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊनही काका स्थिर राहून साधना करतात.’ – सौ. अश्विनी परब आणि सौ. योगिता सावंत, खांदा वसाहत

५. प.पू. गुरुदेवांप्रमाणेच प.पू. दास महाराज यांच्यावर श्रद्धा असणे

‘प.पू. दास महाराज श्री. सावंतकाकांच्या घराजवळ रहातात. त्यामुळे काका गावाला जातात, तेव्हा आवर्जून ते प.पू. महाराजांना भेटायला जातात. सावंतकाकांची प.पू. दास महाराज यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांचा प.पू. गुरुदेवांप्रती जसा भाव आहे, त्याप्रमाणे प.पू. दास महाराजांप्रती भाव आहे. प.पू. महाराजांना ते गुरुप्रमाणे मानतात.’
– सौ. अश्विनी परब, खांदा कॉलनी, पनवेल (७.५.२०१८)