नियोजनकौशल्य, नेतृत्व आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनी देशपांडे !

नियोजनकौशल्य, नेतृत्व आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनी देशपांडे !

‘महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथमोपचार वर्ग आणि पाच जिल्ह्यांतील वाचक अन् धर्माभिमानी यांच्यासाठी दोन दिवसांचे प्रथमोपचार शिबिर ठेवले होते. त्याची सिद्धता करतांना पुणे येथील आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनी देशपांडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, आलेली अनुभूती आणि झालेले लाभ येथे दिले आहेत.

आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनी देशपांडे

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. समष्टी तळमळ : आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनीताईंनी प्रत्येक वर्ग घेतांना सर्व साधकांचा विचार केला आणि ‘कोणाला कोणता विषय द्यायचा ?’, हे सर्वांना विचारून ठरवले. त्यामुळे पुष्कळ नवीन साधकांना संधी मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढला. तेव्हा त्यांचा साधकांविषयी असलेला प्रेमभाव आणि सर्वांना घडवण्याची तळमळ लक्षात आली.

१ आ. साधकांना आधार देणे : वर्ग संपल्यानंतर शंकानिरसनाच्या वेळी त्या स्वतःहून उत्तरे देत होत्या. त्यामुळे नवीन वर्ग घेणार्‍या साधकांना आधार मिळत होता. तेव्हा त्यांचा इतरांना समजून घेण्याचा गुण लक्षात आला आणि प्रथमोपचार घेणार्‍या साधकांमध्ये संघभाव निर्माण झाला.

१ इ. तत्त्वनिष्ठता : वाचक आणि धर्माभिमानी यांच्यासाठी शिबिर घेतांना मला एक विषय सांगण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांनी माझा सराव आणि सिद्धता करवून घेतली. तेव्हा त्यांनी मला माझ्यातील त्रुटी स्पष्टपणे आणि प्रेमाने सांगितल्या. त्या वेळी त्या गुरुदेवांना अपेक्षित असे साधकांना घडवत आहेत आणि ‘आपण रामनाथी येथे शिबिरासाठी एकत्र आलो आहोत’, असे वाटले.

सौ. विदुला देशपांडे

१ ई. नियोजनकौशल्य : कार्यक्रमाचे नियोजन आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनीताई आणि सौ. विदुला देशपांडे यांनी उत्कृष्ट केले होते. ‘विषयांची मांडणी विचारपूर्वक केली आहे’, हे लक्षात आले. वेळेचे नियोजन तंतोतंत होते. वर्ग संपल्यावर सौ. अश्विनीताईंनी शंकानिरसनाचा भाग घेतला. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून सहजता, सुस्पष्टपणा आणि आत्मविश्वास जाणवत होता.

१ उ. शिकण्याची वृत्ती : पहिल्या वर्गात मुंबईच्या श्री. भूषण देवरूखकर यांनी पडद्यावरील चित्र (स्क्रीन शेअरींग) सर्वांना जोडले. ते ताईंनी तत्परतेने शिकून घेतले आणि पुढच्या वर्गात तसे प्रयत्न चालू केले. त्या वेळी त्यांचा पुढाकार घेण्याचा गुण, शिकण्याची तळमळ अन् अभ्यासू वृत्ती लक्षात आली.

१ ऊ. सेवा परिपूर्ण करण्याचा ध्यास लक्षात येणे : त्यांनी कोल्हापूर आणि सातारा या जिल्हासेवकांना दूरभाष करून सेवेच्या नियोजनासंदर्भात संदर्भात कळवले. तेव्हा दायित्व घेतले आहे, तर ते परिपूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास लक्षात आला आणि गुरूंविषयी असलेला भाव आणि भक्ती लक्षात आली.

१ ए. नेतृत्व : महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथमोपचार वर्ग म्हणजे आम्हा सर्वच साधकांचे दायित्व होते; पण त्यांनी स्वतःहून सर्व दायित्व चांगल्या रितीने सांभाळले. त्यात कुठे कशाची न्यूनता जाणवत नव्हती.

वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले

२. अनुभूती

२ अ. आधुनिक वैद्या डॉ. (सौ.) अश्विनीताईंच्या बोलण्यात चैतन्य जाणवत होते. मला ‘त्यांचे शब्द अमृताचा वर्षाव करत आहेत’, असे वाटले.

३. झालेले लाभ

३ अ. सेवेत सुसूत्रता येणे : मला बैठकीत जो विषय सांगायचा आहे, त्याचा मी व्यवस्थित अभ्यास केला. स्वतःचे ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) करून ‘ते वेळेत होत आहे का ?’, हे पहायला आरंभ केला. मला त्याचा लाभ पुढे ‘आरोग्य साहाय्य आणि सुराज्य अभियान’ या सेवा करतांना झाला.

३ आ. आधुनिक वैद्या (सौ.) अश्विनीताईंना जवळून अनुभवता येणे आणि अश्विनी अन् विदुला या दोन चांगल्या मैत्रिणी मिळणे : मी त्यांना इतके जवळून अनुभवले नव्हते, ते अनुभवता आले. मला त्यांच्याविषयी आणि विदुलाताईविषयी पुष्कळ जवळीक वाटू लागली. मला अश्विनी आणि विदुला या दोन चांगल्या मार्गदर्शक मैत्रिणी मिळाल्या.

श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करते की, त्यांचे गुण आत्मसात करण्याची मला बुद्धी आणि शक्ती द्या.’

– वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले, मिरज, सांगली. (१२.६.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक