मदर तेरेसा यांच्या संस्थेचा ‘विदेशी योगदान नोंदणी’चा नूतनीकरण अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाने फेटाळला

पात्रता अटींची पूर्तता न केल्याचा परिणाम !

नवी देहली – ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या ‘विदेशी योगदान (नियमन) कायद्या’नुसार (‘एफ्सीआर्ए’नुसार) झालेल्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याविषयीचा अर्ज पात्रता अटींची पूर्तता न केल्यामुळे आणि काही प्रतिकूल माहिती मिळाल्यामुळे २५ डिसेंबरला नाकारण्यात आला. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेचे कोणतेही बँक खाते गृहमंत्रालयाने गोठवलेले नाही, तर भारतीय स्टेट बँकेनेच संस्थेने केलेल्या विनंतीवरून ही खाती गोठवली आहेत’, असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारने ऐन नाताळमध्ये मदर तेरेसा यांच्या संस्थेची सर्व बँक खाती गोठवल्याचा आरोप केला होता. त्यावर गृहमंत्रालयाने तातडीने स्पष्टीकरण केले.