कानपूर (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे नेते आणि उद्योगपती पियूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

बेहिशोबी १५० कोटी रुपये जप्त

इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी संपत्ती जमा केली जात होती, तोपर्यंत आयकर विभाग आणि अन्य सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? देशात असे किती नागरिक असणार ज्यांनी अशा प्रकारे बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे ! त्यांच्यावर कधी कारवाई होणार ? – संपादक

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील अत्तराचे व्यापारी आणि समाजवादी पक्षाचे नेते  पियुष जैन यांच्या घरातून आयकर विभागाने धाड टाकून १५० कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी रक्कम जप्त केली आहे. आनंदपुरी भागातील पियुष जैन यांच्या घरी नोटांनी भरलेल्या मोठ्या पेट्या सापडल्या आहेत. पियुष जैन हे अखिलेश यादव यांच्या जवळचे असून त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘समाजवादी अत्तरा’चे लोकार्पण केले होते. आयकर विभागाच्या पथकाने नोटा मोजण्यासाठी ४ यंत्रे आणली होती; मात्र नोटांची संख्या पहाता आणखी यंत्रे मागवण्यात आली. ही रक्कम इतकी अधिक होती की, रात्री उशिरापर्यंत ४ यंत्रांद्वारे ४० कोटी रुपये मोजले गेले. नोटा मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांनाही पाचारण करण्यात आले आहे. पियूष जैन यांची जवळपास ४० आस्थापने आहेत. या आस्थापनांच्या माध्यमांतून करचोरी करण्यात आली आहे.