पत्नीला साधनेत पूर्ण सहकार्य करणारे आणि प्रत्येक प्रसंगात तिला आधार देणारे श्री. विनीत सोपान पाटील !

पत्नीला साधनेत पूर्ण सहकार्य करणारे आणि प्रत्येक प्रसंगात तिला आधार देणारे चिंचवड, पुणे येथील श्री. विनीत सोपान पाटील !

‘मूळचे चिंचवड, पुणे येथील आणि सध्या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. विनीत सोपान पाटील यांची पत्नी सौ. अनुराधा विनीत पाटील यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

श्री. विनीत पाटील

१. विवाहापूर्वी

१ अ. निर्व्यसनी आणि शाकाहारी असणे : ‘विवाहाकरिता श्री. विनीत यांचे स्थळ आले, तेव्हा आम्ही दोघांनी भेटायचे ठरवले. पहिल्या भेटीतच आम्ही दोघे १ ते दीड घंटा बोललो. तसे पहाता व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या माझ्या घरच्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यात विनीत फारसे बसत नव्हते; पण माझी मुख्य अपेक्षा अर्थातच अध्यात्माची आवड असलेला, निर्व्यसनी, शाकाहारी आणि मला साधना अन् सेवा करू देणारा, अशी होती. श्री. विनीत कामाला असणार्‍या क्षेत्रातील त्यांच्या मित्रांना मद्य आणि मासांहार यांचे व्यसन असूनही विनीत निर्व्यसनी आणि शाकाहारी होते, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले.

१ आ. स्वतःला साधनेविषयी काही ठाऊक नसतांनाही पत्नीला साधना करण्यास अनुमती देणे : विनीत थोडाफार देवधर्म आणि उपवास करत होते; पण साधनेविषयी त्यांना काही ठाऊक नव्हते. त्यांना घरातील सर्व कामे सांभाळून सेवा आणि साधना केलेली चालणार होते. मी त्यांना पहिल्या भेटीतच ‘संस्थेचे कार्य सांगितले. तसेच आई नसल्याने घरातील सर्व सांभाळून आणि नोकरी सांभाळून मी सुटीचे २ दिवस सेवेला वेळ देते’, असे सांगितले. तसेच ‘तुम्हाला आवडले, तर साधनेविषयी जाणून घेऊन तुम्हीही साधना करू शकता. माझा त्यासाठी आग्रह नाही’, असेही सांगितले. देवाच्या कृपेने त्यांना ते पटले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तू साधना करू शकतेस. माझा काहीच विरोध नाही. मला त्यातील फारसे काही ठाऊक नाही. हळूहळू मला तुझ्याकडून समजेल, तसे मी करीन.’’

विनीत यांच्याशी बोलतांना मला वेगळाच आधार आणि आश्वासन जाणवले. आज असे वाटते, ‘आमच्या त्या पहिल्या भेटीत साक्षात् भगवंतच उपस्थित असल्याने त्यानेच आमच्या मनात सकारात्मक विचार दिला असावा.’ एप्रिल २०१२ मध्ये आमचे लग्न झाले.

२. विवाहानंतर

सौ. अनुराधा पाटील

२ अ. पत्नीला सेवा करण्यास सकारात्मक प्रतिसाद देणे : मला आई नसल्याने आणि ‘मी एका आध्यात्मिक संस्थेत सेवा करते’, हे समजल्याने प्रथम सासरी काही जणांचा पूर्ण होकार नव्हता; पण विनीत त्यांच्या मतावर ठाम राहिले. माझ्या माहेरीही काही कारणांमुळे पूर्ण होकार नव्हता. मी सर्व गुरुदेवांवरच सोपवले होते. मी लग्नाआधी आणि नंतरही पत्रलेखनाची सेवा करायचे. विनीत यांना याविषयी फारशी आवड नसूनही त्यांनी मला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला.

२ आ. सेवा चालू केल्यावर विनीत यांना साधनेविषयी काही सूत्रे सांगणे आणि त्यांनीही ती शांतपणे ऐकून घेणे : लग्नानंतरही साधारण १ मासाने देवाच्या कृपेने मला सर्व सेवा करता आल्या. लग्नानंतर मी प्रत्येक सेवा आणि सत्संग यांसाठी विनीत यांना विचारून जात असे. त्यासाठी त्यांनी मला कधीच नकार दिला नाही. ‘मी जे काही करते, ते फार चांगलेच आहे’, असा त्यांना विश्वास होता. आम्ही सायंकाळी चर्चा करत असतांना मी त्यांना काही सूत्रे हळूहळू सांगत असे. विनीत ती शांतपणे ऐकून घेत असत.

३. पत्नीला सर्वतोपरी साहाय्य करणे

३ अ. स्वयंपाकात साहाय्य करणे : आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने आणि आम्हाला केवळ स्वयंपाक करतांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळायचा; पण विनीत यांनी याविषयी कधीच तक्रार केली नाही. ते मला स्वयंपाकात साहाय्य करायचे. त्याविषयी त्यांना कधी न्यूनता वाटली नाही.

३ आ. पत्नीला आवडत नाही; म्हणून सिनेमाची गाणी न ऐकणे : मला दूरदर्शन पहाण्याची आवड नव्हती. विनीत यांना पूर्वी दूरदर्शन पहायला आणि सिनेमाची गाणी ऐकायला आवडत असे; पण लग्नानंतर त्यांनी कधी ‘दूरदर्शन घेऊया’, असा आग्रह केला नाही आणि मी त्यांना सिनेमाची गाणी ऐकतांनाही फारसे पाहिले नाही. माझा विचार करून तेसुद्धा गाणी लावत नसत.

३ इ. लग्नानंतर त्यांनी मला कधीच पाश्चात्त्य वेशभूषा करण्याविषयी आग्रह केला नाही किंवा ‘केक’ कापून वाढदिवस साजरा करण्याविषयीही आग्रह केला नाही.

३ ई. पत्नीची गर्भारपणात काळजी घेणे : मोक्षदाच्या वेळी गर्भारपणात मला पुष्कळ त्रास होत होता. तेव्हा विनीत यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. ते प्रतिदिन सकाळी उठून स्वयंपाक करून ठेवत. गर्भारपणात मला कंबर आणि पायाचे दुखणे तीव्र असल्याने रात्री कूस पालटणे, बाथरूमला नेणे आदी गोष्टींसाठी ते साहाय्य करत होते.

३ उ. पत्नीला समजून घेणे 

१. जेवणात पोळी, भाजी, वरण, भात असे सर्वच पदार्थ हवेत, असा त्यांचा कधीच आग्रह नसे. अनेकदा आम्ही खिचडी किंवा वरण भात बनवत असू.

२. आम्ही वेळेअभावी नातेवाईकांकडे क्वचितच जायचो. सेवा असली की, सेवेला प्राधान्य द्यायचो; पण विनीत यांची कधीच काही तक्रार नसे.

४. सेवेत साहाय्य करणे

४ अ. पत्नीला सेवेला वेळ मिळावा, यासाठी घरातील कामांमध्ये साहाय्य करणे : लग्न झाल्यावर पहिल्या काही वर्षांमध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा, गुरुपौर्णिमा या वेळी वृत्ते बनवणे, ‘प्रेसनोट’ सिद्ध करणे, सामाजिक प्रसार माध्यमांच्या सेवेचा समन्वय करणे यांसाठी मला रात्री उशिरापर्यंत थांबावे लागे. तेव्हाही विनीत यांचा विरोध नसायचा. मोक्षदा दीड वर्षाची असतांना मला सामाजिक प्रसारमाध्यमाची सेवा करणार्‍या साधकांच्या समन्वयाची सेवा मिळाली. तेव्हा माझा स्वयंपाक राहिला असल्यास मला साहाय्य करीत. ते घरातील जेवणानंतरचे आवरत, मोक्षदाला सांभाळत. त्यामुळे मला सेवा करता यायची. स्वयंपाकघरात सेवा करतांना मला सेवेचा भ्रमणभाष आला, तर ते मला म्हणतात, ‘‘तू आधी सेवा पूर्ण कर. मी हे पहातो.’’ माझ्यापेक्षा ‘मी सेवा करावी’, याची तळमळ विनीत यांनाच अधिक आहे.

४ आ. सेवेसाठी चांगली इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकत घेणे : ते मला सेवेसाठी चांगल्या प्रतीचा भ्रमणसंगणक (लॅपटॉप) घेण्यास आग्रह करायचे किंवा सेवेसाठी अन्य ‘इलेक्ट्रोनिक’ उपकरणे घेऊन द्यायचे.

४ इ. पत्नीला आश्रमात जाण्याची संधी मिळाल्यावर आनंद होणे आणि तिला आश्रमात जाण्याची सिद्धता करण्यास साहाय्य करणे : ऑगस्ट २०१३ मध्ये मला आठवडाभरासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांच्या सेवेच्या दृष्टीने आश्रमात येण्याची अमूल्य संधी मिळाली होती. तेव्हा विनीत यांना पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी मला बरे वाटत नव्हते; म्हणून माझी ‘बॅग’ भरण्यापासून जेवण बनवणे, डबा भरणे आदी सर्व सेवा त्यांनी भावपूर्ण केल्या. गाडीत जेवणासाठी डबा हातात घेतल्यावर आणि डब्याकडे पाहून मला कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. माझ्याकडून सेवेत किंवा साधनेत काही चांगले प्रयत्न झाले की, त्यांना पुष्कळ आनंद होतो.

४ ई. पत्नीला सकारात्मक दृष्टीकोन देणे : मी त्यांना सेवा करतांना किंवा साधकांशी समन्वय करतांना माझ्या मनात आलेले चुकीचे विचार आणि प्रसंगही सांगत असे. तेव्हा ते मला अनेकदा सकारात्मक आणि योग्य दृष्टीकोन देत असत. त्यांना साधना ठाऊक नसूनही ते साधकत्वास धरून दृष्टीकोन देत असत, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटायचे.

५. सेवेला आरंभ

५ अ. गुरुपौर्णिमेच्या वेळी पत्नीला सेवेत साहाय्य करणे : लग्नानंतर ३ मासांनी गुरुपौर्णिमा होती. तेव्हा माझ्याकडे ‘एस्.एस्.आर.एफ्’ च्या संकेतस्थळाची सेवा होती. तेव्हा विनीत यांनी मला स्वतःहून कक्ष मांडणीसाठी आणि ‘पोस्टर’ बनवण्यासाठी साहाय्य केले. त्यांनी गुरुपौर्णिमा हा संस्थेचा पहिला उपक्रम अनुभवला. गुरुपौर्णिमेला त्यांची काही साधकांशी ओळख झाली. ‘सर्व साधक निरपेक्षपणे सेवा करतात’, हे त्यांना फारच आवडले.

५ आ. हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या वेळी भोजनकक्षात सेवा करणे : काही मासांतच हिंदु राष्ट्र जागृती सभा होती. त्या वेळी मला काही कक्षांच्या सेवा होत्या. विनीतही उत्स्फूर्तपणे सेवांमध्ये सहभागी झाले. भोजनकक्षात त्यांनी प्रथमच जेवण वाढणे, पाणी देणे, आवरणे आदी सेवा केल्या. तेव्हा अनेक साधकांनी माझ्याकडे त्याचे कौतुक केले.

५ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करणे : ते कार्यालयातून ५० किलोमीटरचा प्रवास करून घरी आल्यावर जराही कंटाळा न करता दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करायचे. तसेच घरातील सर्व कामे आणि सर्व बाहेरची कामेही करत असत. प्रतिदिन इतका प्रवास करूनही कार्यालयातून येतांना अन्य बाहेरील कामे करायची आणि सेवा करायची, त्यांची सिद्धता असते. ते घरी आल्यावर उत्साही अन् आनंदी असतात.

विनीत नेहमी सकारात्मक राहून, प्रतिमा न जपता, सेवेत आवड-निवड न ठेवता मिळेल ती सेवा झोकून देऊन करण्याचा प्रयत्न करतात.

६. सत्संगाला येणे : विनीत हळूहळू प्रासंगिक सेवा करू लागले आणि आवडीने सत्संगाला येऊ लागले.

७. आध्यात्मिक त्रास चालू होणे

७ अ. शारीरिक त्रास चालू झाल्यावर प.पू. परुळेकर महाराजांकडे गेले असता त्यांनी कौतुक करणे : लग्नानंतर ३ – ४ मासांतच मला शारीरिक त्रास चालू झाले. त्या संदर्भात आम्ही एका साधकाच्या समवेत प.पू. परुळेकर महाराजांच्या दर्शनास गेलो होतो. तेव्हाही विनीत काहीच आढेवेढे न घेता येण्यास सिद्ध झाले. दर्शनाच्या वेळी परुळेकर महाराज म्हणाले, ‘‘अरे, ही तर लक्ष्मीनारायणाची जोडी आहे.’’ याचा मला तेव्हा उलगडा झाला नाही; पण नंतर ‘देवाने एकमेकांच्या साधनेसाठी आम्हाला एकत्र आणले’, हे माझ्या लक्षात आले.

७ आ. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नीट रहावे, यासाठी नोकरी सोडणे आणि त्या वेळी यजमानांनी सकारात्मक राहून पुष्कळ आधार देणे : लग्नाला एक वर्ष झाल्यावर शारीरिक त्रास पुष्कळ प्रमाणात वाढल्याने आणि कार्यालयातही माझा पुष्कळ संघर्ष अन् तणावाची स्थिती असल्याने आम्ही एकत्र चर्चा करून मी नोकरी सोडली. ‘माझे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नीट रहावे’, यासाठी विनीत यांनी पैशांचा विचार न करता माझी काळजी घेतली. मी अनेकदा म्हणत असे, ‘‘चांगल्या वेतनाची नोकरी सोडली, यासाठी सगळे नातेवाईक मला पुष्कळ बोलतात. सासू, सासरे बोलतात. कसे करू ?’’ तेव्हा विनीत मला पुष्कळ सकारात्मक आधार देतात. ते म्हणतात, ‘‘तू नोकरी न करता साधना कर. मी नोकरी करत आहे ना ? तू साधनेत प्रगती कर. तुझे पाहून आणि तुझ्या समवेत मलाही शिकायला मिळेल अन् मीसुद्धा सेवा करू लागीन.’’ मी नोकरी सोडली, याचे विनीत यांना जराही वाईट वाटत नाही. ते म्हणतात, ‘‘आपण घेतलेला निर्णय योग्यच होता. देवाच्या कृपेने त्यामुळे तुला सेवेला वेळ देता येतो.’’

८. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे : मोक्षदाच्या जन्मानंतर विनीत म्हणाले, ‘‘आपण गोव्याला घर घेऊन राहूया. मी तेथे अर्धवेळ नोकरी शोधीन. तू आणि मोक्षदा आश्रमात पूर्णवेळ सेवा करा.’’ विनीत यांचा पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय ऐकून अनेक साधकांना आश्चर्य आणि कौतुकही वाटले. ‘त्यांनी सतत माझ्या सेवेचा विचार केला, यातच देवाने त्यांचीही साधना करवून घेतली’, असे वाटले.

९. एका संतांशी झालेली भेट

९ अ. संतांच्या बोलण्याने प्रभावित होऊन पूर्ण वेळ साधना करण्याचा निश्चय अधिक पक्का होणे : २४.६.२०१९ या दिवशी आमची एका संतांशी भेट झाली. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘मायेतील नोकरी करण्यापेक्षा देवाची नोकरी केलेली चांगली.’’ हे वचन त्यांना भावले होते. तेव्हापासून त्यांच्या मनात ‘कार्यालयात नोकरी करून काहीच समाधान मिळत नाही. तेवढा वेळ तळमळीने साधना केली, तर जन्माचे सार्थक होईल’, असे विचार येऊ लागले. त्यानंतर त्यांचा पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय अधिक पक्का झाला.

९ आ. संतांनी केलेले कौतुक : तेव्हा विनीत म्हणाले होते, ‘‘लग्नाआधी मला साधना ठाऊक नव्हती. मी पत्नीमुळे साधनेत आलो. त्यामुळे मला माझ्या पत्नीविषयी कृतज्ञता वाटते.’’ ते संत माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘‘त्यांना नाही, तुम्हाला त्यांच्या चरणी कृतज्ञ रहायला हवे. किती छान पती मिळाले !’’

१०. अंतर्मुखता येणे : दळणवळण बंदीच्या काळात विनीत यांनी २ – ३ मास व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न केले. तेव्हा विनीत आवरण काढणे, सत्र करणे आदी करतांना मलाही आठवण करून द्यायचे. विनीत त्यांच्या चुकाही मला विचारतात. मी त्यांना चूक सांगितली असता ते अनेकदा चूक स्वीकारून ‘मी पुढील वेळी प्रयत्न करतो’, असे म्हणतात. काही वेळा त्यांना चूक स्वीकारणे जमत नाही; पण ते तसे मोकळेपणे सांगून ‘प्रयत्न करतो’, असे म्हणतात. सेवा करतांना किंवा अन्य प्रसंगात त्यांच्या मनात आलेले अयोग्य विचार, प्रतिक्रिया मला मोकळेपणाने सांगतात. यावरून ‘त्यांच्यात अंतर्मुखता येत आहे’, असे लक्षात येते.

११. प्रेमभाव

अ. विनीत यांनी लग्न झाल्यावर अल्प कालावधीतच माझ्या काही नातेवाईकांशी चांगली जवळीक निर्माण केली. ते मला माझ्या नातेवाइकांना भ्रमणभाष करण्याची आठवण करून देतात. ते माझ्या नातेवाइकांना स्वतःहून भ्रमणभाष करतात. माझ्या वडिलांशीही त्यांचे मुलासारखे नाते होते. ते माझ्या वडिलांची पुष्कळ काळजी घ्यायचे.

आ. माझे वडील गेल्यावरही विनीत यांनी मला आणि भावाला पुष्कळ आधार दिला.

इ. ते साधकांशीही मोकळेपणाने बोलतात. काही साधकांना तातडीची सेवा किंवा काही साहाय्य हवे असल्यास ते तत्परतेने साहाय्य करतात.

ई. त्यांना वेतन अल्प होते; पण ते दुसर्‍यांना भरभरून देतात. ते त्यांची आई आणि बहीण यांना उंची साड्या देतात. त्यांच्यासाठी विविध खाऊ, फळे आणतात. भाच्यांना कपडे वा खेळणी देतात. माझ्या माहेरच्यांसाठीही कपडे आणि भेटवस्तू घेतात.

उ. विनीत यांना वेगवेगळे पदार्थ करण्याची पुष्कळ आवड आहे. ते आईप्रमाणे पदार्थ बनवून मला ताटात वाढतात. त्यांच्या हाताला चवही चांगली आहे.

१२. पत्नीशी आध्यात्मिक मैत्रीचे नाते असणे : ते मला सतत विचारत असतात, ‘भाव कसा ठेवायचा ?’ साधनेचे एखादे सूत्र त्यांच्या लक्षात आले नाही, तर ते मोकळेपणाने विचारतात. आमच्यामध्ये साधनेविषयी, चुकांविषयी चर्चा होते, तेव्हा त्यांचा एकमेकांना साहाय्य करण्याचा विचार असतो. आमच्यामध्ये एक आध्यात्मिक मैत्रीचे नाते निर्माण झालेले असते.

१३. दुसर्‍यांचा विचार करणे : आम्ही चारचाकी घेतल्यावर त्यांनी मला चारचाकी शिकण्यास प्रोत्साहन दिले आणि ती मला सेवेसाठी वापरण्यास सांगितली. ‘घरात कोणतीही वस्तू आणली, तरी त्याचा वापर इतरांच्या सोयीसाठी व्हावा’, असे त्यांना वाटते. ते ‘स्वतःला शारीरिक त्रास झाला, तरी चालेल; पण आम्हाला होऊ नये’, यासाठी तत्पर असतात. ते परिस्थिती स्वीकारून त्यात स्थिर आणि समाधानी असतात.

१४. शिकण्याची वृत्ती : आम्ही काही दिवस स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात आलो होतो. तेव्हा प्रक्रिया नवीन असूनही त्यांना ती शिकण्याची ओढ होती.

१५. देवावर दृढ श्रद्धा : त्यांनी पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाविषयी मी त्यांना अनेकदा विचारले, ‘‘पूर्णवेळ साधना करणे आपल्याला जमेल का ?’’ तेव्हा ते म्हणतात, ‘‘देवच करवून घेणार आहे.’’

१६. श्री. विनीत यांचे स्वभावदोष आणि अहं : अल्पसंतुष्टता, चालढकलपणा, वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण न बोलणे, विचार करून न बोलणे, प्रतिक्रिया येणे, स्वतःच्या मतावर ठाम असणे

१७. अनुभूती : मला विनीत यांच्या पायांकडे पाहिले की, कृष्णाच्या चरणांची आठवण येऊन पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘त्यांच्या माध्यमातून कृष्णच माझ्याजवळ आहे’, असे वाटते.

१८. प्रार्थना आणि कृतज्ञता : ‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेने मला साधनेस पूरक, सर्वतोपरी साहाय्य करणारे पती लाभले आहेत. त्यांच्यातील गुण शिकून मला आत्मसात करता येऊ देत. आम्हाला एकमेकांना साधनेच्या दृष्टीने एकमेकांचे साहाय्य घेऊन साधनेत प्रगती करता येऊदे. आम्हाला केवळ आपल्या चरणी अर्पण होण्याची आस राहू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

गुरुदेवांच्याच कृपेने मला विनीत यांच्या माध्यमातून आई-वडील आणि जिवलग मित्र यांचे निरपेक्ष प्रेम अन् साहाय्य अनुभवायला मिळत आहे. मला स्थुलातून आई-बाबा नसले, तरी गुरुदेव माझी विनीतच्या माध्यमातून काळजी घेत आहेत. गुरुमाऊली आणि विनीत यांनी आजवर माझ्यासाठी जे केले, त्यासाठी मी त्यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’

– सौ. अनुराधा विनीत पाटील, चिंचवड, पुणे. (११.११.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक