पणजी येथील हिंदू रक्षा महाआघाडीच्या संस्था-प्रतिनिधींच्या मेळाव्यात सर्वानुमते ठराव
पणजी – येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचे वा संमिश्र सरकार आले, तरी मुख्यमंत्री हिंदूच असला पाहिजे. याचे कारण गोव्यात ७० टक्के हिंदू आहेत. शिवाय गोव्यातील ३४ हिंदूबहुल मतदारसंघांत उमेदवार हिंदूच असला पाहिजे, असा ठराव हिंदू रक्षा महाआघाडीच्या संस्था-प्रतिनिधींच्या मेळाव्यात २० डिसेंबरला सर्वानुमते ॐ च्या गजरात दोन्ही हात उंचावून संमत करण्यात आला. गोव्यातील विविध २३० संघटनांचे ३०० प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते.
या वेळी व्यासपिठावर मेळाव्याचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, सुराज्य संग्रामचे डॉ. सूरज काणेकर, भारत स्वभिमानचे श्री. कमलेश बांदेकर, राष्ट्रीय बजरंग दल गोवा विभागाचे श्री. नितीन फळदेसाई, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि भारतमाता की जय संघ, गोवा विभागाचे प्रा. प्रवीण नेसवणकर उपस्थित होते.
१५ सप्टेंबर २०२१ या दिवशी ७७ संस्थांच्या प्रतिनिधींच्या सहभागानिशी स्थापन झालेल्या ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चा हा दुसरा मेळावा २० डिसेंबरला पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात झाला. गोव्यातील सर्व छोट्या-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संस्था एकाच व्यासपिठावर आणण्याचे कार्य या निमित्ताने चालू झाले आहे.
हिंदू रक्षा महाआघाडी पुढील समान सूत्रांवर आधारित काम करणार आहे.१. धर्मांतरास विरोध |
मेळाव्यात ही पाचही सूत्रे समजावून सांगणारी विषयमांडणी पुढील संस्था आणि प्रतिनिधी यांनी केली.
१. धर्मांतरे – श्री. शैलेंद्र वेलिंगकर, गोमंतक परशुराम सेना
२. जिहादांचे प्रकार – श्री. सत्यविजय नाईक, हिंदू जनजागृती समिती
३. मंदिरांची सुरक्षा – श्री. विनायक च्यारी, राष्ट्रीय बजरंग दल
४. धर्मशिक्षण – श्री. जितेंद्र आमशेकर, राष्ट्रीय विचार मंच
५. हिंदू संस्कार – श्री. गणेश गावडे, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद
प्रारंभी सौ. शुभा सावंत यांनी श्री गणेशवंदना सांगून मेळाव्याला प्रारंभ झाला. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ.सूरज काणेकर यांनी मेळाव्यातील उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदु समाजाच्याच रक्षणासाठी प्रयत्न करावे लागतात, हे दुर्भाग्य आहे. तरी ते आजच्या परिस्थितीत आपले प्रथम कर्तव्य ठरते. आपण सर्वजण मिळून हिदूसंघटनाचे हे कार्य यशस्वी करू.’
मेळाव्याचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी हिंदु समाजाची देशभर आणि गोव्यात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चाललेली ससेहोलपट उदाहरणांसहित विशद् केली. ते म्हणाले, ‘‘देशभर आणि गोव्यातही छोटी छोटी पाकिस्ताने राजकीय पाठिंब्याने उभी रहात आहेत. मंदिरांचे व्यवस्थापन, भूमी आणि संपत्ती कह्यात घेऊन त्यावर अहिंदूंची नियुक्ती, मंदिराच्या समित्यांवर अहिंदूचा अंतर्भाव, प्रसाद बनवण्याचे कंत्राट अहिंदूंकडे देणे, संत, पुजारी आणि हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या, असे अन्याय चालू आहेत. गोव्यातील ‘सनातन प्रभात’ हे दैनिक हिंदूंच्या या समस्या वेळोवेळी दैनिकात मांडत आहे.
देहली, केरळ, बेंगळुरू, बंगाल या राज्यांत हिंदूविरोधी दंगलीत हिंदूंची घरे आणि दुकाने यांची लूट, बलात्कार, जाळपोळ करण्यात आली. गोव्यात अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाकरता श्रीराम सेनेवर आणि त्या संघटनेचे नेते श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गेली १० वर्षे बंदी अन् आतंकवादी आणि पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.शी संबंध असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशद्रोही कृत्यांकडे कानाडोळा, अशी परिस्थिती आहे. सरकार वा कोणताही राजकीय पक्ष हिंदूंच्या रक्षणार्थ येणार नसून हिंदूंनीच आत्मरक्षणार्थ संघटित झाले पाहिजे.’’
१७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२२, या कालावधीत तालुका मेळावे !
पुढचा टप्पा म्हणून गोव्यातील १२ तालुके आणि सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुका या ठिकाणी १७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२२, या कालावधीत तालुका मेळावे घेऊन अधिकाधिक हिंदु संस्था महाआघाडीत सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यांच्या निमंत्रकांची या वेळी निवड करण्यात आली. |
श्री. नितीन फळदेसाई यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. श्री. संदीप पाळणी हे कार्यक्रमाचे प्रमुख होते. शेवटी सौ. शुभा सावंत यांनी शांतीमंत्र सांगितला आणि ऋणनिर्देश केला.