सध्या जगभर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगातील प्रत्येक देश कोणत्याही परिस्थितीत कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी झगडत आहे. अमेरिका आणि युरोप या दोन्ही ठिकाणी हाहाःकार उडाला आहे. त्यांना पूर्णपणे वाटते की, त्यांच्या या दुर्दशेला केवळ चीन उत्तरदायी आहे. ते सध्या चीनला सतत धमक्या आणि चेतावणी देत आहेत. आगामी संकट ओळखून चीनही स्वतःची सिद्धता करत आहे; परंतु हा तणाव जगाला तिसर्या महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो. याविषयीच्या प्रबळ संकेतांविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.
१. चीनकडून सतत करण्यात येणारे परमाणू परीक्षण !
जगाला कोरोनामध्ये गुंतवून चीनने परमाणूचे परीक्षण केले आहे, असे म्हटले जात आहे. चीनमधील परमाणूविषयक संस्थांनी भूमीच्या खाली अल्प तीव्रतेच्या बाँबचे स्फोट घडवून आणले आहेत. चीनच्या या परमाणू परीक्षणाची माहिती अमेरिकेतील यंत्रणांनी दिली आहे; परंतु याविषयी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. तथापि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर चीनने ‘लॉप नूर’ चाचणी करण्याच्या स्थळावर परीक्षण केले आहे. सर्वांत आधी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्रात छापलेल्या या वृत्तावर अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘बहुतेक चीन लॉप नूर येथील परीक्षण स्थळ वर्षभर चालू ठेवण्याच्या सिद्धतेत आहे. त्या ठिकाणी मोठे कक्ष (स्फोटक चेंबर्स) बनवले आहेत. लॉप नूरमधील अणूचाचणीविषयी चीनकडून पारदर्शकता दाखवली जात नाही.’
२. चीनकडून तेल साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ !
२ अ. मागील काही दिवसांत एका प्रसिद्ध झालेल्या वृत्तात ‘चीन युद्धाच्या सिद्धतेत गुंतला आहे’, असे म्हटले होते. चीनने मागच्या एका मासामध्ये स्वतःकडील तेलाच्या राखीव साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कच्चे तेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे चीन मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा करण्याच्या प्रयत्नात आहे. कच्चा तेलाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने, तसेच रशियासमवेतच्या किमतीच्या स्पर्धेमुळे सौदी अरेबियाने पुरवठा वाढवला आहे. यामुळे मार्च मासात ‘यूएस् ऑईल फ्यूचर’ आणि ‘ब्रेंट व्रूड’ यांच्या किमती गेल्या १८ वर्षांत प्रथमच अर्ध्यावर आल्या आहेत.
२ आ. सी.एन्.पी.सी.च्या म्हणण्यानुसार, ‘वर्ष २०२० च्या शेवटापर्यंत चीन त्याच्या आणीबाणीच्या काळात वापरल्या जाणार्या तेलाच्या साठ्यामध्ये ८.५ कोटी टन तेल साठवू पहात आहे. हा साठा अमेरिकेकडून त्याच्या ‘स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’मध्ये (आणीबाणीच्या काळातील पेट्रोल साठा) ठेवल्या जाणार्या तेलाच्या साठ्यापेक्षा अधिक आहे. अमेरिकेतील हा साठा जगभरातील सर्वांत मोठा तेलसाठा (बॅकअप) आहे.’
२ इ. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘मार्च मासामध्ये चीनने कच्च्या तेलाची आयात १२ प्रतिशतने वाढवून ती आता ४ कोटी ३० लाख मिलियन टन एवढी झाली आहे. गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाची किंमत ५० प्रतिशतहून अधिक खाली आली आहे.’
३. चीनकडून समुद्रात स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न !
कोरोना संकटामध्ये चीनने समुद्रात त्याची शक्ती दाखवायला प्रारंभ केला आहे.
३ अ. दक्षिण चीन सागरामध्ये चीनने मासे पकडणार्या व्हिएतनाम देशाच्या एका नौकेला धडक देऊन ती बोट बुडवली. या बुडणार्या नौकेवर ८ लोक होते. त्या पाठोपाठ चीनने व्हिएतनामच्या २ नौकांना कह्यात घेतले.
३ आ. जानेवारी मासापासून फिलिपिन्सच्या कह्यात असलेल्या पगासा द्वीपाजवळ न्यूनतम १३० चिनी नौका दिसल्या आहेत.
३ इ. चीनने दक्षिण चीन सागरामध्ये मानवनिर्मित मोठ्या बेटांवर २ नवीन संशोधन केंद्रे चालू केली आहेत. ही दोन्ही संशोधन केंद्रे वादग्रस्त द्वीपसमूह क्षेत्रामध्ये ‘फिल्ड नेव्हिगेशन’ आणि अन्य संशोधन करत आहेत. त्यांना थांबवणारी अमेरिका सध्या कोरोनामध्ये गुंतली आहे.
चीनने समुद्रात स्वतःचा विस्तार करण्याची नीती कित्येक वर्षांपासून चालू ठेवली आहे; परंतु जगाला कोरोनाच्या संकटात गुंतवल्यानंतर त्याच्या कारवाया कित्येक पटींनी वाढल्या आहेत. आधी अमेरिकेचे नौदल त्यांना विरोध करत होते; परंतु अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे चीनच्या कारवायांवरून अमेरिकेचे लक्ष बाजूला गेले आहे. दक्षिण चीन सागर आणि पूर्व चीन सागर या दोन्ही ठिकाणी चीनची विस्तारवादी नीती चालूच असते. चीन नेहमी दक्षिण चीन सागरावर त्याचा हक्क सांगत असतो. खरेतर या सागरावर व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, ब्रूनेई आणि तैवान या देशांचाही अधिकार आहे. पूर्व चीन सागरामध्ये चीन आणि जपान समोरासमोर उभे ठाकतात. ‘दक्षिण आणि पूर्व चीन सागर खनिज संपत्तीने समृद्ध आहेत’, असे मानले जाते. जगाच्या काराभाराविषयी हे जलक्षेत्र महत्त्वाचे आहे. आता कोरोना संकटाचा लाभ घेऊन चीन या प्रदेशावर त्याची पकड घट्ट करत आहे.
४. अमेरिकेने चीनला दिलेली परिणाम भोगण्याची धमकी !
अमेरिकेमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याविषयी तिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला उत्तरदायी ठरवत आहेत. एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने ‘चीन त्याच्या कृत्याचा परिणाम भोगणार नाही का ?’, असा प्रश्न ट्रम्प यांना केला. तेव्हा ट्रम्प रागावून म्हणाले, ‘‘चीनला परिणाम भोगावे लागणार नाही, हे तुम्हाला कसे ठाऊक ?’’ त्यावर त्या पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारला की, ‘चीनवर कोणती कारवाई होईल ? चीनच्या या कृत्याविषयी त्याला कोणता परिणाम भोगावा लागेल ?’ तेव्हा ट्रम्प यांनी उत्तर दिले, ‘‘चीनला काय परिणाम भोगावा लागेल, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. चीनलाच कळेल की, त्याने जे केले, त्याचा परिणाम चांगला नाही.’’ ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिका चीनवर अप्रसन्न आहे, हे यातून स्पष्ट होते. अमेरिका कारवाई करण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पहात आहे.
५. ब्रिटनचाही चीनवरच राग !
एकीकडे अमेरिका चीनवर अप्रसन्न असतांना दुसरीकडे ब्रिटनही त्याच्या हानीविषयी चीनलाच उत्तरदायी ठरवत आहे. कोरोना विषाणू संक्रमित झाल्याची खात्री झाल्यावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सर्व ब्रिटीश कुटुंबियांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी ‘परिस्थिती ठीक होण्याऐवजी अजून खराब होईल’, अशी चेतावणी दिली आहे. पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र कोरोना विषाणूशी लढण्याविषयी सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेसमवेत टपालाद्वारे ३ कोटी घरांमध्ये पाठवण्यात आले आहे. यासाठी जवळजवळ ५८ लाख पौंड (५४ कोटी ७२ लाख ७ सहस्र ७१९ रुपये) व्यय आला. ब्रिटनचे पंतप्रधान यांनी म्हटले आहे की, ते कडक पावले उचलण्यापासून मागे सरणार नाहीत आणि त्यानंतर स्थिती चांगली होण्याऐवजी अजून बिघडू शकते.
६. चीनवरील कारवाईचे रूपांतर युद्धात !
जगातील महाशक्ती मानले जाणारे अमेरिका आणि युरोपमधील देश त्यांचे वर्चस्व संपुष्टात येत असल्याविषयी अस्वस्थ आहेत. आतापर्यंत ते जगातील महाशक्ती आणि शक्तीशाली देश मानले जात होते. ते जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा कोणत्याही देशावर डोळे वटारून त्यांच्यावर प्रतिबंध लादत होते; परंतु आज कोरोनापुढे त्यांनी गुडघे टेकले आहेत. जगावर आर्थिक नियंत्रण ठेवणारे फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, स्पेन आणि युरोप आणि पश्चिमेचे सर्व देश आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे युरोपमधील देश आणि अमेरिका यांचे जे वर्चस्व होते, ते आता चीनच्या हाती जात असल्याचे दिसून येत आहे. जे देश जगातील व्यवस्था आणि अर्थनीती यांचे संचालक होते, त्यांच्यावर आज नाक घासण्याची पाळी आली आहे. यामुळे कोरोनाचे संकट संपल्यानंतर अमेरिका आणि युरोप कोणत्याही क्षणी चीनवर दंडात्मक कारवाई करू शकतील आणि त्याचे रूपांतर युद्धात होऊ शकते.
७. दक्षिण चीन समुद्रात चीनला रोखण्यासाठी अमेरिकेकडून भारताला क्षेपणास्त्रे !
कोरोना संकट असूनही चीनची विस्तारवादी नीती पाहून युरोप आणि अमेरिका यांना भारताकडून बरीच अपेक्षा आहे. महामारीचे संकट असूनही अमेरिकेने भारताला १ सहस्र १७८ कोटी रुपये किमतीची ‘हार्पून’ आणि ‘टॉरपिडो’ क्षेपणास्त्रे विकण्याचा निर्णय घेतला. चीनमुळे समुद्रामध्ये निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या कराराला संमती दिल्याचे तेथील संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी छापलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, या क्षेपणास्त्रांमुळे भारताला क्षेत्रीय आव्हानाला सामोरे जाण्यासाठी साहाय्य होईल.
अमेरिकच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कॉर्पाेरेशन एजन्सी’ने त्यांच्या संसदेत या कराराविषयी माहिती दिली आहे. वर्ष २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला संरक्षणाविषयी ‘मुख्य मित्रा’चा दर्जा दिला होता. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ‘हार्पून’ क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हवेतून समुद्राच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासह कोणत्याही संशयास्पद नौकेला लक्ष्य बनवून आक्रमण करता येते. ‘पेंटागॉन’च्या म्हणण्यानुसार यामुळे अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांना संवेदनशील समुद्री क्षेत्रांवर लक्ष आणि सहयोग वाढवण्यासाठी साहाय्य होईल. ‘दक्षिण चीन समुद्रात चीनची विस्तारवादी नीती रोखणे’, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
८. संभाव्य महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी !
आगामी महायुद्धाच्या धोक्याचे अनुमान आल्याने अमेरिकेतील जनता अस्वस्थ होत आहे. या महामारीच्या काळात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी केली आहे, हे आणखी एक त्यांच्या अस्वस्थतेचे कारण आहे; कारण अमेरिकेने मार्च मासात जी खरेदी केली, ती गत २० वर्षांहून सर्वांत अधिक आहे. एफ्.बी.आय.ने (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) दिलेल्या आकडेवारीवरून असे लक्षात येते की, यावर्षी मार्च मासात २० लाखांहून अधिक हत्यारे (फायर आर्म्स) खरेदी केली गेली.
अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये हत्यारे खरेदीसाठी धावपळ चालू झाल्यासारखी स्थिती आहे. अमेरिकेतील इलिनॉय प्रांतामध्ये सर्वाधिक हत्यारांची खरेदी झाली. यानंतर टेक्सास, केंटुकी, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया यांचा क्रमांक लागतो. जाणकारांचे असे मत आहे की, अमेरिकेमध्ये कोरोनाचे संकट संपल्यावर महायुद्धासारख्या संकटाची स्थिती आल्यास तेथील ‘सिव्हील सोसायटी’ म्हणजे अग्नीशमन, पोलीस आणि आरोग्य या सेवा उद्ध्वस्त होऊ शकतात. यामुळे अमेरिकेतील कायदा आणि सुव्यवस्था डळमळू शकते. अशा परिस्थितीत स्वतःला वाचवण्यासाठी हत्यार खरेदी करणे, हा उपाय योग्य ठरू शकतो.
९. कोरोनाचे संकट संपल्यावर सर्व जग चीनवर तुटून पडेल आणि संघर्षाचे रूपांतर महायुद्धात होईल !
९ अ. संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक बँक यांच्या आकडेवारीनुसार अमेरिकेनंतर चीन ही जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. चीनचे महत्त्वाकांक्षी सरकार पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा धरून आहे आणि चीनचे ते फार पूर्वीपासूनचे स्वप्न आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणू आहे, हे नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या दिवसांत सर्वांना कळले; परंतु त्यापूर्वी कितीतरी मास चीनने याविषयीची माहिती लपवून ठेवली. तसेच चीन पुष्कळ कालावधीपर्यंत हा विषाणू हवेतून पसरणारा आहे, हे सत्य नाकारत राहिला.
९ आ. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जेव्हा कोरोनासंबंधी पारदर्शकता ठेवण्यासाठी बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला, तेव्हा चीनने त्याचा ‘व्हेटो’ (नकाराधिकार) वापरून ही बैठक रहित केली.
९ इ. कोरोनाचा संसर्ग जेव्हा पहिल्या अवस्थेत होता, तेव्हाच सर्व देशांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करण्यासाठी योग्य पावले उचलण्यासाठी प्रयत्न केले; पण चीनने यामध्ये खोडा घातला. या संकेतावरून कोरोनाच्या निमित्ताने चीन त्याची विस्तारवादी नीती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, ही गोष्ट स्पष्ट होते. अमेरिका आणि युरोप यांनीही चीनचा हा कुटील डाव ओळखला आहे; परंतु ते सध्या कोरोनाशी झगडण्यात गुंतले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट संपल्यावर सर्व जग चीनवर तुटून पडेल आणि या संघर्षाचे महायुद्धात परिवर्तन होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
(साभार : ‘झी न्यूज’चे संकेतस्थळ)