खाद्यपदार्थ कोणत्या घटकांपासून बनवला, याची विस्तृत माहिती न देणार्‍या आस्थापनांवर कारवाई करू ! – देहली उच्च न्यायालय

मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ खाणार्‍यांना याची माहिती मिळाली पाहिजे ! – उच्च न्यायालय

मुळात सरकारनेच अशा आस्थापनांना त्यांचे खाद्यपदार्थ विक्री करतांना ते शाकाहारी कि मांसाहारी, हे विस्तृतपणे स्पष्ट करण्यास सांगणे अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांना न्यायालयात जाऊन त्यावर न्यायालयाला आदेश देण्यास लागू नये !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – आपण काय खातो, हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकास पूर्ण अधिकार आहे. एखादा खाद्यपदार्थ बनवतांना त्यात कोणते अन्नघटक वापरले आहेत, याची संपूर्ण माहिती उत्पादक आस्थापनांनी दिली पाहिजे. ते घटक कोणत्या प्राण्याचे किंवा झाडापासून बनवले आहेत, याचाही विस्तृत तपशील आस्थापनांंनी दिला पाहिजे. हा पदार्थ नैसर्गिक पद्धतीने बनवला कि प्रयोगशाळेत, याचीही माहिती आस्थापनांनी द्यावी. त्यामुळे हा पदार्थ शाकाहारी आहे कि मांसाहारी, हे लोकांना सहजपणे ओळखता येईल. यापुढे आस्थापनांनी अशी माहिती न दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘खाद्यपदार्थ ज्या घटकांपासून बनवले आहेत, त्यानुसार त्यांच्यावर शाकाहारी किंवा मांसाहारी असा स्पष्ट उल्लेख करण्याचा आदेश संबंधित आस्थापनांना द्यावा’, अशी याचिका राम गौ रक्षा दलाने देहली उच्च न्यायालयात केली होती.

आस्थापने लबाडी करतात !

उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, झटपट बनवण्यात येणार्‍या ‘नूडल्स’ या खाद्यपदार्थामध्ये ‘डिसोडियम इनोसिनेट’ हा वापरण्यात येणारा घटक मांस किंवा मासे यांपासून बनवतात; मात्र ती माहिती ग्राहकांना नीट दिली जात नाही. तरीही काही आस्थापने हे खाद्यपदार्थ शाकाहारी असल्याचे सांगतात. या पद्धतीची लबाडी कुणीही करू नये; म्हणून दक्ष रहाणे आवश्यक आहे.

शाकाहारी पदार्थच खाणार्‍या नागरिकांच्या अधिकारांवर गदा येते !

न्यायालयाने म्हटले की, कोणत्या पदार्थांमध्ये मांसाहारी घटक वापरले जातात, याची सूची संबंधित विभागाचे अधिकारी करू शकलेले नाहीत. अशा गोष्टींमुळे नागरिकांच्या विशेषत: शाकाहारी पदार्थच खाणार्‍या नागरिकांच्या अधिकारांवर गदा येत आहे.