सकारात्मक आणि आनंदी असणार्या सनातनच्या अकलूज येथील साधिका सौ. प्रमिला ननावरे यांची पू. (कु.) दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या समष्टी संत) आणि सहसाधिका सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
लेखिका : पू. (कु.) दीपाली मतकर, सोलापूर
१. ‘काकू सतत आनंदी आणि उत्साही असतात.
२. स्थिरता
काकू प्रत्येक सेवा आणि कृती स्थिर राहून करतात. त्यांना कितीही अडचण आली किंवा एखाद्या साधकाने सेवा करण्यासाठी घाई केली, तरी काकू स्थिर राहून शांतपणेच सेवा करतात.
३. सर्वांशी प्रेमाने बोलणे
साधकांनी एखादे सूत्र सौ. ननावरेकाकूंना पुनःपुन्हा विचारले, तरी काकू पुष्कळ नम्रतेने उत्तर देतात. त्या सर्वांशीच भावपूर्ण, एका लयीत, प्रेमाने आणि लीनतेने बोलतात. ‘बोलतांना त्यांचा स्वर चढला आहे’, असे कधीच होत नाही. काकूंचे बोलणे गोड असून ते ‘ऐकत रहावे’, असे वाटते.
४. सकारात्मक
घरात साधनेसंदर्भात प्रतिकूलता असूनही त्या त्यावर मात करून आनंदाने आणि सकारात्मक राहून सेवा करतात.
५. जिज्ञासूंशी जवळीक करणे
जिज्ञासूंना संपर्क करून त्या त्यांना सहजतेने साधना सांगतात. जिज्ञासूही काकूंच्या प्रेमभावामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलतात. ‘त्यांनाही काकूंशी बोलल्यावर आईशीच बोलत आहोत’, असे वाटून काकूंचा आधार वाटतो.
६. सेवेची तळमळ
काकू शाळेत शिक्षिका आहेत. घरातील कामे करून त्या शाळेतील कामे, साधना सत्संग (या सत्संगात साधना आणि नामजप यांविषयीचे महत्त्व सांगितले जाते.), संपर्क सेवा अशा बर्याच सेवा करतात. मध्येच काही साधक अडचणीसाठीही काकूंना संपर्क करतात. काकू कामात व्यस्त असल्या, तरी साधकांना प्रतिसाद देऊन त्यांची सेवा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. ‘मी व्यस्त आहे किंवा मला आता जमणार नाही’, असे त्या कधीच सांगत नाहीत.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
अ. सौ. ननावरेकाकूंमध्ये पुष्कळ भाव आहे. त्या सतत भावाच्या स्तरावर रहाण्याचा प्रयत्न करतात.
आ. ‘मला साधना करण्यासाठी अडचणी आहेत किंवा त्रास होत आहे’, असे त्या कधीच सांगत नाहीत. त्यांना काय अडचण येते, हे त्यांना विचारल्यावरच कळते. त्याविषयीही त्यांचा ‘गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) माझ्याकडून सर्व करवून घेतात आणि त्यांच्यामुळेच मी आनंदी आहे’, असा भाव असतो.’
लेखिका : सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सोलापूर
१. प्रेमभाव
‘काकूंच्या बोलण्यातून पुष्कळ प्रेमभाव जाणवतो. त्या साधकांना कधीच दुखवत नाहीत.
२. सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करणे
त्या सूत्रसंचालन सेवा भावपूर्ण करतात. त्यांना सेवेत काही पालट सांगितले, तर त्या लगेच स्वीकारतात. त्या प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करतात.’ ०
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १२.११.२०२१)