भारतात एक टक्का लोकांकडे देशाची २२ टक्के संपत्ती ! – जागतिक विषमता अहवाल

भारताचा सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या सूचीमध्ये समावेश

  • असे असेल, तर याला ‘स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर भारताने केलेली प्रगती’ असे म्हणायचे का ? – संपादक
  • विदेशातील संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात येणार्‍या अशा प्रकारच्या अहवालावर किती विश्‍वास ठेवायचा ?, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे ! यास्तव सरकारने या अहवालातील दाव्याची सत्यता पडताळून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – ‘भारत हा गरीब आणि असमानता असलेला देश आहे’, असे ‘जागतिक विषमता अहवाल २०२२’मध्ये म्हटले आहे. हा अहवाल वर्ष २०२१ च्या माहितीवर आधारित आहे. वर्ष २०२० मध्ये जागतिक उत्पन्नातही लक्षणीय घट झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल ‘वर्ल्ड इनक्वालिटी लॅब’चे सह-संचालक लुकास चॅन्सेल यांनी सिद्ध केला आहे. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ञांनी हा अहवाल सिद्ध करण्यास हातभार लावला आहे.

या अहवालात म्हटले आहे की,

१. भारत हा एक असा देश आहे, जेथे १० टक्के लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नात ५७ टक्के वाटा आहे, तर लोकसंख्येच्या खालच्या स्तरातील (५० टक्के) घटकांचा केवळ १३ टक्के वाटा आहे.

२. भारतातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न २ लाख ४ सहस्र २०० रुपये आहे, तर खालच्या स्तरातील (५० टक्के) उत्पन्न ५३ सहस्र ६१० रुपये आहे आणि लोकसंख्येच्या १० टक्के लोकांचे उत्पन्न जवळपास २० पट, म्हणजेच ११ लाख ६६ सहस्र ५२० रुपयांपेक्षा अधिक आहे.

३. या १० टक्के लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५७ टक्के वाटा आहे, तर एक टक्का लोकसंख्येकडे तो २२ टक्के आहे. त्याच वेळी तळाच्या ५० टक्के लोकसंख्येचा वाटा केवळ १३ टक्के आहे.

४. भारतातील सरासरी घरगुती मालमत्ता ९ लाख ८३ सहस्र १० रुपये आहे. भारत हा गरीब आणि उच्चभ्रू लोकांनी भरलेला अत्यंत असमान देश आहे.

५. भारतात लैंगिक असमानता अत्याधिक आहे. महिला कामगारांच्या उत्पन्नाचा वाटा १८ टक्के आहे. आशियातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे.