नागालँडमध्ये सुरक्षादलांनी आतंकवादी समजून केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू

संतप्त गावकर्‍यांनी सुरक्षादलाच्या गाड्या जाळल्या !

कोहीमा (नागालँड) – ईशान्य भारतातील नागालँड राज्यात ४ डिसेंबरच्या सायंकाळी सुरक्षादलांकडून आतंकवादी समजून करण्यात आलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त गावकर्‍यांनी सुरक्षादलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या गोळीबारात ठार झालेले लोक मजूर होते आणि काम संपल्यानंतर ‘पिकअप मिनी ट्रक’मधून घरी परतत होते. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रिओ यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी त्यांनी विशेष अन्वेषण यंत्रणा स्थापन केली आहे. ‘या चौकशीत जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, असे रिओ यांनी सांगितलेे. गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेविषयी शोक व्यक्त केला. यासह भारतीय सैन्याकडूनही या घटनेविषयी खेद व्यक्त करण्यात आला असून चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

आतंकवादी येणार असल्याची सुरक्षादलांना मिळाली होती माहिती !

सुरक्षादलांना आतंकवादी गाडीतून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी ‘एन्.एस्.सी.एन्.’ नावाच्या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी असल्याची आणि ते आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यामुळे कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. तेथे ज्या रंगाच्या गाडीतून आतंकवादी येणार होत, त्याच रंगाची गाडी आल्यानंतर सुरक्षादलाच्या सैनिकांनी गाडी थांबण्याचे आवाहन केले; मात्र गाडी थांबवली नाही. यानंतर सुरक्षादलांकडून गोळीबार केला गेला. तथापि या गाडीत मजूर असल्याने ते मारले गेले.

गावकर्‍यांशी झालेल्या संघर्षात एक सैनिक हुतात्मा ?

या घटनेविषयी गावकर्‍यांनी माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी आले आणि ते सैनिकांकडून शस्त्रे हिसकावू लागले. त्यांनी सैनिकांची गाडी पेटवून दिल्यानंतर सैनिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केला. यात काही नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. या संघर्षामध्ये सुरक्षादलाचा एक सैनिक हुतात्मा झाल्याचे सांगितले जात आहे; मात्र अद्याप या घटनेला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

या दुर्दैवी घटनेने मी दु:खी आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करून म्हटले की, नागालँडमधील ओटिंग येथे झालेल्या दुर्दैवी घटनेने मी दु:खी आहे. ज्यांनी प्राण गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकार उच्चस्तरीय चौकशी करणार आहे.