नाशिक येथील ३ हत्यांच्या घटनांच्या निषेधार्थ सातपूर पोलीस ठाण्यासमोर भाजप पदाधिकार्‍यांचे ठिय्या आंदोलन !

अमोल इघे हत्या प्रकरण

नाशिक – युनियनच्या वादातील आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून जिल्ह्यातील सातपूर येथे भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल इघे (वय ३७ वर्षे) यांची नुकतीच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. संशयितास अटक करण्यात यावी, या मागणीसाठी २६ नोव्हेंबर या दिवशी भाजपचे महापौर, ३ आमदार, नगरसेवक, शहराध्यक्ष यांसह पदाधिकार्‍यांनी ३ घंटे सातपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. २४ घंट्यांत आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी ‘संशयित विनायक उपाख्य विनोद बर्वे याला पोलिसांनी ठाणे जिल्ह्यात अटक केली आहे. बर्वे याच्यावर यापूर्वीही सातपूर पोलीस ठाण्यात प्राणघातक आक्रमणांसह अनेक गुन्हे नोंद आहेत. औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात भाजपप्रणीत महाराष्ट्र राज्य कामगार संघाची युनियन आहे. या युनियनचा कामगार प्रमुख म्हणून बर्वे कामकाज बघत होता’, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांत शहरात ३ हत्यांच्या घटना घडल्याने सुस्त पोलीस यंत्रणेवर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.