सौ. अर्पिता देशपांडे यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रक्रिया राबवल्यावर त्यांना स्वत:त जाणवलेले पालट

‘मला सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. ही प्रक्रिया राबवण्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, प्रक्रियेच्या वेळी झालेला मनाचा संघर्ष, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगामुळे साधनेला मिळालेली दिशा अन् प्रक्रियेनंतर माझ्यात जाणवलेले पालट यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. या प्रक्रियेद्वारे देवाने जीवनात अमूल्य असा अमृताचा साठा दिला. त्याविषयी श्री गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

१५ नोव्हेंबर या दिवशी या लेखातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

सौ. अर्पिता देशपांडे

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/527480.html


४. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न

४ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न केल्यावर घरच्याप्रमाणे आश्रमातील स्वयंपाकघरातील सेवा मनापासून करता येऊ लागणे : एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आमच्या साधनेच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी पुढील दृष्टीकोन दिला. ‘घरी असतांना सर्वकाही आपल्यालाच करायचे आहे, हे ठाऊक असल्याने आपण ते करत असतो. त्याच विचाराने आश्रमात मिळालेली सेवाही करता आली पाहिजे.’ त्यानंतर मला स्वयंपाकघरातील सेवा स्वीकारता येऊ लागली आणि ती मनापासून होऊ लागल्याने आनंद मिळू लागला.

४ आ. आढावा घेणार्‍या सौ. सुप्रियाताईंविषयी सकारात्मकता निर्माण व्हावी, यासाठी केलेले प्रयत्न : ‘आढावा घेणारी सौ. सुप्रियाताई माथूर माझी जवळची मैत्रीण आहे. माझे तिच्यावर प्रेम आहे’, असा भाव ठेवल्यामुळे मला आढाव्यात माझ्या चुका तिला मोकळेपणाने सांगता येऊ लागल्या. त्यामुळे मला असलेला आढाव्याचा ताण न्यून होत गेला. माझ्या मनात प्रक्रियेविषयी सकारात्मक विचार येऊ लागले. आढावा घेणार्‍या सुप्रियाताईतील गुरुतत्त्वाला शरण जाऊन आणि सूक्ष्मातून तिच्या चरणांवर डोके ठेवून ‘तिने आढाव्यात सांगितलेली सर्व सूत्रे स्वीकारून त्याप्रमाणे मनापासून प्रयत्न करता येऊ दे’, अशी माझ्याकडून गुरुदेवांना प्रार्थना होऊ लागली. या प्रक्रियेद्वारे जन्मोजन्मी केलेल्या पापांतून गुरु आपल्याला मुक्त करत असल्याचे जाणवू लागले.

४ इ. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेली ‘भगवद्गीता’ असून श्रीकृष्णाप्रमाणे गुरुदेव आपल्याला ‘स्वभावदोषांशी कसे लढायचे ?’, हे शिकवत आहेत’, असा भाव ठेवणे : ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची ही प्रक्रिया म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ‘भगवद्गीता’च आहे. युद्धभूमीवर असतांना ‘या सर्व कौरवांचा आधीच मृत्यू झाला आहे. तुला केवळ शस्त्र उचलायचे आहे’, असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. त्याप्रमाणेच आपल्या अंतर्मनातील कौरवरूपी स्वभावदोष आणि अहं गुरुच नष्ट करू शकतात. आपल्याला क्रियमाण वापरून केवळ मनापासून प्रयत्न करायचे आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘धर्म-अधर्माच्या युद्धात स्वतःच्या दोषांशी कसे लढायचे ?’, याचे ज्ञान दिले. त्याप्रमाणे प्रक्रियेत गुरु आपल्याला स्वतःचे दोष आणि अहं यांच्याशी लढून ‘देवाच्या कृपेस पात्र कसे व्हायचे ?’, याचे ज्ञान देत आहेत’, असा भाव ठेवल्याने सकारात्मकता निर्माण होऊ लागली. ‘आपल्याला प्रक्रिया आत्मसात् करता यायला हवी’, असे आतून वाटू लागले.

५. प्रक्रिया राबवल्यानंतर स्वतःत जाणवलेले पालट

५ अ. सकारात्मकता वाढणे : पूर्वी मनाची अस्वस्थता अधिक काळ टिकून रहात होती. ‘आपले मन अस्वस्थ आहे’, हे प्रसंग घडल्यावर लक्षात येत होते. आता प्रसंग घडत असतांनाच ते लक्षात येते आणि त्यावर लगेच मात करून अल्पावधीत सकारात्मक होता येते.

५ आ. यजमानांशी एकमत होणे : पूर्वी बर्‍याच निर्णयांवर माझे आणि यजमानांचे एकमत होत नसे. आता आम्ही दोघे एकमेकांचा विचार समजून घेतो आणि आमचे एकमत होते. दोघेही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करत असल्यामुळे आमच्यात हा पालट होऊ शकला.

५ इ. गुरूंनी प्रक्रिया करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञताभाव वाढून मन भरून येणे : ‘गुरूंनी आपल्याला प्रक्रिया राबवण्याची संधी दिली’, ही त्यांची केवढी मोठी कृपा आहे ! ‘साधकांनी चुका झाल्यावर खचून न जाता साधनेतील पुढील प्रयत्न करावेत आणि त्यांचे जीवन आनंदी व्हावे’, यासाठी ते सतत प्रयत्नरत आहेत. ते या प्रक्रियेच्या माध्यमातून साधकांना स्वभावदोष आणि अहं रूपी रोगातून बाहेर काढत आहेत. त्यांना आत्मबळ देत आहेत. या त्रिभुवनात कुठेच असे गुरु सापडणार नाहीत. त्यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असे वाटू लागले.

६. घरी रहावेसे वाटणे, त्यानंतर परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर मन लगेचच आश्रमात रहाण्याबद्दल सकारात्मक होणे, तेव्हा परात्पर गुरुदेव हृदयातच असून प्रत्येक गोष्ट ऐकत असल्याची जाणीव होणे आणि त्यानंतर त्यांनी पाठवलेल्या खाऊमुळे त्याची प्रचीतीच येणे

काही दिवसांनी आम्ही घरी गेलो. त्यानंतर ‘आम्हाला मिरज आश्रमात सेवेसाठी जायचे आहे’, असे कळल्यावर मनाला ‘घर सोडून पूर्णवेळ मिरज आश्रमात राहून साधना करायची’, हे स्वीकारता येत नव्हते. मी परात्पर गुरुमाऊलींच्या छायाचित्रासमोर बसून त्यांना आत्मनिवेदन केले, ‘तुम्ही मला प्रक्रिया शिकवलीत. तुम्ही माझ्यासाठी पुष्कळ कष्ट घेतलेत; परंतु माझ्यातील दोषरूपी अहं मला तुम्ही शिकवलेल्या मार्गावर चालण्यास परावृत्त करत आहे. मी काय करू ? तुम्हीच या मनाला शांत करा आणि माझ्यावर कृपा करा.’ त्या क्षणी चमत्कार व्हावा, त्याप्रमाणे ५ मिनिटांच्या आतच माझे मन अतिशय शांत आणि सकारात्मक झाले. तेव्हा ‘गुरुदेव माझ्या हृदयातच आहेत आणि तेच माझी सर्वतोपरी काळजी घेत आहेत अन् इथून पुढेही घेणार आहेत’, याची मला जाणीव झाली. हा प्रसंग घडवून गुरूंनी प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आणून दिले; म्हणून माझे मन कृतज्ञतेने भरून आले.

त्याच दिवशी करुणाकर गुरुमाऊली रहात असलेल्या रामनाथी आश्रमातून एका साधकासमवेत आम्हाला प्रसाद पाठवण्यात आला. तेव्हा ‘गुरुदेव माझ्या अंतरंगातच असून माझा प्रत्येक विचार ऐकत आहेत’, याची मला जाणीव झाली.

७. प्रार्थना

‘हे गुरुदेवा, आम्हाला ही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आत्मसात करता येऊ दे. ही प्रक्रिया हीच आमची वृत्ती होऊ दे. साधनेचे प्रयत्न सातत्याने करण्यासाठी आम्हाला शक्ती आणि बळ मिळू दे. आमचे संपूर्ण जीवन शुद्ध आणि निर्मळ बनून आपल्या चरणी समर्पित होऊ दे’, हीच आपल्या पावन चरणी प्रार्थना !’

(समाप्त)

– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (२०.११.२०१६)

लहानपणापासूनच गुरुदेव प्रत्येक क्षणी समवेत असल्याचे जाणवून त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होणे

मी साधारण ३ री किंवा ४ थी मध्ये शिकत होते. तेव्हा आम्ही ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या शहरात रहात होतो. एक दिवस आम्ही घरातील सर्वजण दुसर्‍या शहरात जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेलो. अचानक मी सर्वांपासून दूर होऊन रेल्वे फलाटावरील गर्दीत हरवले. त्या वेळी माझ्या आत्याने मला त्या अफाट गर्दीतून शोधून आणले. तेव्हा तिच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवच माझ्यासाठी धावून आले होते. आताप्रमाणेच ‘तेव्हाही मी वाट चुकले आहे’, याची मला जाणीव नव्हती. ‘गुरुमाऊली, तेव्हापासून किंबहुना त्याच्याही आधीपासून तुम्ही माझ्या समवेतच आहात. मला या प्रसंगाची आठवण नव्हती; पण ती आता (साधनेच्या मार्गात मी भरकटल्याच्या प्रसंगातून) देवाने मला करून दिली. तेव्हा जर तुम्ही मला सांभाळले नसते, तर ‘आता मी कुठे असते’, याची मी कल्पनाही करू शकत नाही.’

परात्पर गुरुदेवांनी या प्रसंगाची मला आठवण करून देऊन ‘तेच माझे सर्वस्व होते, आताही आहेत आणि शेवटपर्यंत असणार आहेत’, याची मनाला जाणीव करून दिली. त्यामुळेच आश्रमात रहातांना मला कोणत्याही प्रकारचा ताण आला नाही. साधनेतील हा फार अवघड टप्पा गुरुदेवांनीच अलगद पार करून घेतला.

– सौ. अर्पिता विपीन देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (२०.११.२०१६)