पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून विजेचे दर अल्प करण्याच्या घोषणेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचा घरचा अहेर !

निवडणुकीसाठी जनतेला ‘लॉलीपॉप’ (आश्‍वासने देऊनही ती पूर्ण न करणे) दाखवण्याचा प्रयत्न असल्याची टीका !

निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जनतेला काही ना काही फुकट देण्याच्या घोषणा करत असतो; मात्र हा खर्च या पक्षांच्या खिशातून नव्हे, तर जनतेने भरलेल्या करांतूनच केला जातो, हे जनतेला कधी समजणार ?

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी

चंडीगड – पंजाबचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी विजेचे दर ३ रुपयांनी अल्प करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र त्यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी टीका केली आहे.

‘हा निर्णय जनतेला निवडणुकीसाठी ‘लॉलीपॉप’ दाखवण्याचा प्रयत्न आहे’, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

पंजाबमधील संयुक्त हिंदु महासभेच्या एका कार्यक्रमात सिद्धू म्हणाले की, पंजाब राज्याच्या कल्याणाविषयी कुणी बोलेल का ? ‘हे फुकट आहे, ते फुकट आहे’, असे म्हणत सरकार ‘लॉलीपॉप’ देते. हे केवळ २ मासांत होणार आहे का ? कारण नंतर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जे राजकारणी आश्‍वासने देत आहेत, ती आश्‍वासने कशी पूर्ण करणार ?, असा प्रश्‍न सिद्धू यांनी उपस्थित केला.