सोलापूर, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – प्रत्येक साधकाला सतत आनंद देण्यासाठी धडपडणार्या, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेतलेल्या, साधनेतील प्रत्येक अडथळ्यावर सकारात्मकतेने मात करणार्या, तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्या पू. (कु.) दीपाली मतकर यांचा ‘संत सन्मान’ सोहळा म्हणजे भावसोहळाच !
पू. (कु.) दीपाली मतकर या सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी अल्प कालावधीतच साधकांना आपलेसे केले. साधकांना कधी मायेने, तर कधी कठोर होऊन साधनेत पुढे जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. भक्तीभावाने सेवा करणे आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ या गुणांमुळे त्यांनी श्रीगुरूंचे मन जिंकले. दीपाली म्हणजे ‘दिव्यांची ओळ !’ हे नाव सार्थ ठरवत पू. दीपालीताईंनी साधकांच्या प्रगतीचे जणू दीपच लावले. अशा भक्तीभावाचे मूर्तीमंत स्वरूप असणार्या पू. (कु.) दीपाली मतकर यांनी संतपद गाठले. ज्या क्षणाचा केवळ सोलापूर जिल्हाच नाही, तर अनेक संतही आतुरतेने वाट पहात होते, तो क्षण अंततः आला.
२८ ऑक्टोबर या दिवशी पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) या सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घोषित केले. ही वार्ता ऐकून साधकांचा भाव जागृत झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी पू. (कु.) दीपाली मतकर यांचे वडील श्री. रामचंद्र मतकर आणि लहान भाऊ श्री. नीलेश मतकर हेही ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून सोहळ्यात सहभागी झाले होते. या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. या वेळी सौ. सुनंदा म्हेत्रे (वय ५३ वर्षे) आणि श्री. राजन बुणगे (वय ६६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचेही घोषित करण्यात आले.
असे उलगडले गुपित !
मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे साधकांना एकमेकांना भेटता आले नव्हते. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने साधक एकत्र आले होते. साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि कु. दीपाली मतकर यांना पहाण्याचीही ओढ लागली होती. मार्गदर्शनाच्या निमित्ताने साधकांची ही इच्छा पूर्ण झाल्याने त्यांचा आनंद अधिकच द्विगुणीत झाला. काही वेळातच सद्गुरु (कु.) स्वातीताई यांनी ‘कोरोना संसर्गाच्या काळातही साधकांनी साधनेचे कसे तळमळीने आणि चिकाटीने प्रयत्न केले’, याविषयी मार्गदर्शन करण्यास आरंभ केला. या वेळी सौ. सुनंदा म्हेत्रे (वय ५३ वर्षे) आणि श्री. राजन बुणगे (वय ६६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्ममृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ‘हा आनंद इथेच थांबणार नसून पुढे पुष्कळ मोठा आनंद गुरुदेवांनी ठेवला आहे’, असेच सर्वांच्या तोंडवळ्यावरील भाव सांगत होते. त्यानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी कु. दीपाली मतकर यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांना व्यासपिठावर येण्याची विनंती केली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दीपालीताईंना कधी प्रश्न विचारून, तर कधी पूर्वीच्या काही अनुभूतींची आठवण करून देत अत्यंत सहजतेने आणि कौशल्याने मुलाखतीद्वारे त्यांचा संपूर्ण साधना प्रवास उलगडला. हा साधनाप्रवास साधक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. या वेळी वातावरणात एक वेगळीच शांतता आणि थंडावा जाणवत होता. तितक्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवत कु. दीपाली मतकर यांनी ७१ टक्के पातळी गाठून त्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता दिली. सर्वांच्याच लाडक्या दीपालीताई संतपदी विराजमान झाल्याने साधकांच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
अवघे जीवन कृष्णमय झालेल्या आणि साधकांची प्रगती व्हावी, यासाठी अविरत प्रयत्न करणार्या कु. दीपाली मतकर वयाच्या ३३ व्या वर्षी सनातनच्या ११२ व्या संतपदावर विराजमान !मूळच्या डोंबिवली, ठाणे येथे रहाणार्या कु. दीपाली रामचंद्र मतकर वर्ष २००५ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. पहिल्यापासूनच कु. दीपाली यांना साधनेची आवड असल्याने आणि भगवान श्रीकृष्णाप्रती त्यांचा अनन्य भाव असल्याने ‘कृष्ण’ हेच त्यांचे भावविश्व होते. ईश्वरप्राप्तीच्या ओढीने त्यांनी तळमळीने साधनेला आरंभ केला. आरंभी ‘भोळ्या भावाने देवाला आळवणे आणि श्रीकृष्णाच्या भक्तीत रमून जाणे’, अशी त्यांची व्यष्टी प्रकृती होती. आध्यात्मिक प्रगती झाल्यावर साधकांची प्रतिभा आपोआप जागृत होऊ लागते. साधनेमुळे दीपाली यांचीही प्रतिभा जागृत होऊन त्यांना कवितांच्या रूपात ज्ञान स्फुरू लागले. या कवितांतून त्यांची भगवंताप्रतीची भक्ती, व्याकुळता आदी सर्व गोष्टी सहजसुंदर भाषेत व्यक्त झाल्या आहेत. कु. दीपाली यांचे वैशिष्ट्य म्हणजे आरंभी व्यष्टी प्रकृती असलेल्या दीपाली यांनी ‘शिकण्याची वृत्ती’, ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘साधकांवरील निरपेक्ष प्रीती’ या गुणांद्वारे व्यष्टी अन् समष्टी साधनेची सुरेख सांगड घातली. या गुणांमुळे रामनाथी आश्रम सोडून समष्टीमध्ये जाऊन प्रसार करण्याची सेवाही त्यांनी स्वीकारली. त्यांनी अनेक साधकांत साधनेची तळमळ निर्माण केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आरंभी रत्नागिरी आणि आता सोलापूर येथील बालसाधक, तसेच साधक यांचे साधनेचे प्रयत्न वाढले. दीपाली यांनी साधकांना घडवल्यामुळे, त्यांच्यात भावाचे बीज रोवल्यामुळे अनेक साधकांनी आध्यात्मिक उन्नती करून घेऊन ६१ टक्के पातळी गाठली आहे. दीपाली यांच्यातील तळमळ, भगवंताप्रती भाव, निरपेक्ष प्रीती आदी गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१३ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली होती आणि आज ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या ११२ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांनी संतपद प्राप्त केले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. यापुढेही पू. (कु.) दीपाली मतकर त्यांची आध्यात्मिक उन्नती अशीच शीघ्र गतीने होईल, याची मला खात्री आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१०.२०२१) |
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ यांमुळे कु. दीपाली मतकर संतपदी विराजमान झाल्या ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
‘आतापर्यंत संत तुकाराम महाराज, संत जनाबाई यांसारख्या संतांचा श्री विठ्ठलाप्रती भाव कसा होता, याचे आपण केवळ श्रवण केले होते; पण तो भाव प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी आपल्याला मिळाली नाही. भगवंताने तो भाव प्रत्यक्ष अनुभवता येईल, अशी संधीच जणू कु. दीपाली मतकर यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली ! त्यांचा साधनाप्रवास या संतांप्रमाणेच आहे. त्यांनी लहान वयातच कुटुंबाचे दायित्व सांभाळले. त्यानंतर त्यांनी रामनाथी येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ साधनेला प्रारंभ करून आश्रमातील विविध प्रकारच्या सेवा करणे, तसेच संतांची सेवा करणे यांसह नंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांतील अध्यात्मप्रसाराचे दायित्वही लीलया सांभाळले आहे. त्या वयाने लहान असूनही साधकांवर आईप्रमाणे प्रेम करतात. ‘भक्ताची आंतरिक तळमळ असेल, तर देव त्याला भेटतोच’, याप्रमाणे कु. दीपाली मतकर यांच्यातील सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ यांमुळे त्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी काढले.
पू. (कु.) दीपालीताई यांना संत घोषित केल्यानंतर सद्गुरु स्वातीताईंनी केलेले मार्गदर्शन !
पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यातील गुण स्वतःत येण्यासाठी साधकांनी प्रयत्न करायला हवेत ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
पू. (कु.) दीपाली मतकर यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असल्याने त्यांनी अल्प कालावधीत गुरुदेवांचे मन जिंकले आहे. भक्तासाठी देव धावून येतो. ‘ती भक्ती कशी असावी’, हे पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या साधनाप्रवासातून लक्षात येते. तळमळीने साधना केल्यास देव भक्तासाठी काहीही करतो. त्यांचा साधनाप्रवास ऐकून माझाही कृतज्ञताभाव दाटून येत आहे. पू. (कु.) दीपाली यांच्यातील गुण स्वतःत येण्यासाठी साधकांनी प्रयत्न करायला हवेत.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनाही २८ ऑक्टोबर २०१३ या दिवशी म्हणजे दिवाळीला ४ दिवस शेष असतांना संत म्हणून घोषित करण्यात आले होते, अगदी त्याचप्रमाणे पू. (कु.) दीपाली मतकर यांनाही दिवाळीला ४ दिवस शेष असतांनाच संत घोषित म्हणून करण्यात आले. हा दैवी योगायोगच म्हणावा लागेल. |
संत म्हणून घोषित झाल्यावर पू. (कु.) दीपाली मतकर यांनी व्यक्त केलेले मनोगत
देव आपल्याला भरभरून देत असल्याने झोकून देऊन सेवा आणि साधना करूया ! – पू. (कु.) दीपाली मतकर
सद्गुरु (कु.) स्वातीताई यांनी केलेले मार्गदर्शन आणि सर्व साधकांनी माझ्यातील स्वभावदोष सांगून केलेले साहाय्य यांमुळेच आध्यात्मिक प्रगती करणे शक्य झाले. देव आपल्याला भरभरून देत आहे. देवाला अशक्य असे काहीच नाही. त्यामुळे आता झोकून देऊन सेवा आणि साधना करूया.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (कु.) दीपाली हिला गुणरूपी रत्न बनवले ! – रामचंद्र मतकर (पू. (कु.) दीपाली मतकर यांचे वडील)
दीपालीची आनंदवार्ता ऐकून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याप्रती माझा कृतज्ञताभाव दाटून आला. साधनेमध्ये सातत्य आणि चिकाटी या गुणांमुळे दीपाली संतपदी विराजमान झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच सद्गुरु (कु.) स्वातीताईंच्या माध्यमातून तिला घडवले. त्यांनी तिला गुणरूपी रत्न बनवले आहे. हे केवळ प.पू. डॉक्टरच करू शकतात. त्यामुळे मी त्यांच्या चरणी अत्यंत कृतज्ञ आहे. (या वेळी त्यांचा भाव जागृत झाला होता.)
ताई संत झाल्याची आनंदवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला ! – नीलेश मतकर (पू. (कु.) दीपाली मतकर यांचे लहान भाऊ)
ताई संत झाली, ही आनंदवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला. आम्ही दोघे लहान असतांनाच आईचे निधन झाले, तेव्हापासून तिनेच माझा प्रेमाने सांभाळ केला आहे. परात्पर गुरुमाऊलींनी तिला जवळ घेऊन आम्हाला आनंद दिला. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.
सन्मान सोहळा झाल्यानंतर सोलापूर सेवाकेंद्रात पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या स्वागतासाठी साधकांनी फलकावर कविता लिहिली होती. तेथे रांगोळी काढून पणत्यांची भावपूर्ण सजावट केली होती. |
मुलाखत घेतांना स्वत:च्या ठिकाणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अस्तित्व अनुभवता आले ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
पू. (कु.) दीपाली मतकर यांची मुलाखत घेण्यापूर्वी मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘ही मुलाखत घेतांना मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे. तुम्हाला अपेक्षित अशी ही मुलाखत घेतली जाऊ दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना केली. प्रत्यक्षातही मुलाखत घेतांना मला माझ्या ठिकाणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवत होते, तसेच सोहळ्याला उपस्थित असणार्या साधकांनीही मला आवर्जून सांगितले, ‘तुमच्या ठिकाणी आम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होऊन त्याच मुलाखत घेत आहेत’, असे जाणवत होते.
‘सद्गुरु (कु.) स्वातीताई मुलाखत घेतांना त्या आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू एकरूप आहेत’, असे जाणवले ! – पू. (कु.) दीपाली मतकर
‘सद्गुरु (कु.) स्वातीताई माझी मुलाखत घेत असतांना, तसेच माझ्याकडे पहातांना, बोलतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्यासारखेच त्यांचे हास्य जाणवत होते. ‘आम्ही दोघीही कोणत्यातरी दैवी लोकात आहोत’, असे जाणवत होते. ‘मुलाखतीच्या वेळी प्रश्न विचारतांना सद्गुरु स्वातीताई बोलत आहेत कि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत आहेत’, हे कळतच नव्हते. या वेळी ‘सद्गुरु स्वातीताई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू या दोघीही एकरूप आहेत’, असे जाणवत होते.
सन्मान सोहळ्यातील काही अविस्मरणीय क्षण !
|
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक