हिंदु वसुंधरा !

संपादकीय 

जगाचे कल्याण करणाऱ्या हिंदु धर्माचा प्रसार जगभर होणे आवश्यक !

इंडोनेशियाचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती सुकर्णाे यांची मुलगी सुकमावती या इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार आहेत. २६ ऑक्टोबर या दिवशी धार्मिक विधी करून त्या हिंदु धर्माचा अंगीकार करणार आहेत. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले इस्लामी राष्ट्र म्हणून इंडोनेशिया ओळखले जाते. त्या देशाच्या संस्थापक राष्ट्रपतींच्या मुलीने उतारवयात म्हणजे वयाच्या ७० व्या वर्षी स्वत:हून हिंदु धर्माचा स्वीकार करणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. उतारवयात हिंदु जीवनपद्धती, संस्कार यांचे महत्त्व लक्षात येणे, हेसुद्धा नसे थोडके !

सध्या जगात दोन प्रमुख धर्म म्हणजे इस्लाम आणि ख्रिस्ती आहेत. जगातील १५७ देश ख्रिस्ती, ५२ देश इस्लामी आणि हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देश बौद्ध आहेत. हिंदु धर्म हा देशाचा धर्म असलेला एकही देश पृथ्वीवर नाही. बहुसंख्य हिंदू असूनही राजकारण्यांनी भारत घटनात्मकदृष्ट्या ‘निधर्मी देश’ म्हणून घोषित केला आहे, तर ‘हिंदु राष्ट्र असलेला’ नेपाळ साम्यवाद्यांनी गिळंकृत केला आहे.

ईश्वरनिर्मित असलेला हिंदु धर्म हा चैतन्याने ओतप्रोत भरला आहे. तो निसर्ग, मानवी आचार-विचार यांना अनुकूल आणि सहजरित्या मानवाचे जीवन उंचावून त्याला सृष्टीचा निर्माता ईश्वराजवळ नेणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासापासून आणि धर्म, नीतीनियम यांची सध्याच्या मनुष्याला जाण होईपर्यंतच्या काळापासून हिंदु धर्माने कधीही बळजोरी केली नाही. तेव्हा केवळ हिंदु धर्मच असल्याने बळजोरी करण्याचाही प्रश्न नव्हता. हिंदु धर्म जगभर होता; मात्र अन्य पंथांचा उदय, त्यांचा आक्रमकपणा आणि ‘जेत्याचा धर्म तो जगाचा धर्म’ या नियमानुसार हिंदु धर्माला उतरती कळा लागली.

राजपुरोहित सब्दपालन यांची भविष्यवाणी

अनेक चक्रवर्ती हिंदु सम्राटांनी पृथ्वीवर राज्य केले आहे. कालांतराने अन्य पंथियांची दीक्षा घेतलेल्या आक्रमकांमुळे हिंदूंचा सहनशील स्वभाव, काही ठिकाणी हिंदूंमधील सद्गुण विकृती, तर काही ठिकाणी घरभेदीपणा आणि फितूरी यांमुळे हिंदूंची साम्राज्ये लयाला गेली आणि त्या समवेत हिंदु धर्म जगाच्या अनेक प्रदेशांतून संपुष्टात आला. इंडोनेशियाचेच उदाहरण घेतले, तर तेथे पहिल्या शतकापासून ते १५ व्या शतकापर्यंत हिंदु धर्म समृद्ध होत गेला. हिंदु धर्मीय राजांचे राज्य राहिले. जावा, सुमात्रा या बेटांवर हिंदु संस्कृती वर्धिष्णु झाली. इंडोनेशियातील राजा जयबाय यांच्या काळात त्याने हिंदु धर्माचे रक्षण केले आणि हिंदु संस्कृती टिकवली. जयबाय राजा ‘ब्रह्मदेव हे त्याचे पूर्वज आहेत’, असे सांगायचा, तर राजाची प्रजा त्याला विष्णूचा अंश मानायची. पंधराव्या शतकात जेव्हा तेथील राजा ब्रविजया पाचवा हा हिंदु धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतरित झाला. तेव्हा राज्याचा राजपुरोहित सब्दपालन यांनी राजदरबारात खडे बोल सुनावतांना सांगितले, ‘‘मी राजाच्या २ सहस्र वर्षांच्या दैवी परंपरेचा नोकर आहे. आता धर्मांतरित झालेल्यांचा नोकर होऊ शकत नाही. मी माझ्या मूळ स्थानी परत जात आहे; मात्र राजाला एवढेच सांगतो की, ५०० वर्षांनी मी पुन्हा हिंदु बौद्ध धर्म जावामध्ये सर्वत्र आणीन. जे कुणी तेव्हा ऐकणार नाहीत, त्यांचा नाश होईल आणि त्या सर्वांना हादरवून सोडेपर्यंत मी शांत बसणार नाही.’’ राजपुरोहित सब्दपालन यांची ही भविष्यवाणी इंडोनेशियातील जुन्या-जाणत्या लोकांना अजूनही स्मरणात आहे.

तत्कालीन प्रजेला आश्वासित करतांना सब्दपालन यांनी सांगितले, ‘‘जेव्हा माऊंट मेरापी या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याची राख आणि लाव्हा उत्तर-पश्चिम दिशेला पडून उग्र वास येईल, तेव्हा मी पुन्हा येण्याची ती खूण असेल.’’ वर्ष १९७८ मध्ये देशात आधुनिक हिंदु मंदिरांची बांधकामे पूर्ण झाली, अनेक मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारला आणि माऊंट मेरापीवरील ज्वालामुखीचा उद्रेकही झाला होता. सब्दपालन यांची भविष्यवाणी सत्यात उतरत असल्याची प्रचीती स्थानिक इंडोनेशियातील नागरिकांना येत आहे.

जगभर पसरलेला हिंदु धर्म

हिंदु धर्म हा देवता, संत, ऋषिमुनी, राजा यांच्या शक्तीवर आणि तपोबलावर टिकून राहिला आहे. हिंदु धर्मावर अनेक संकटे आली, तरी तो नष्ट झाला नाही; कारण तो ईश्वरनिर्मित आहे. थायलंड येथे जगातील सर्वांत उंच उभी धातूची श्री गणेशमूर्ती आहे, तर जावा येथील जागृत ज्वालामुखीच्या तोंडाजवळ त्याच्यापासून आसपासच्या लोकांचे रक्षण होण्यासाठी श्री गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. थायलंड विमानतळावरच समुद्रमंथनाचा देखावा आहे. कंबोडियातील ४०० एकर परिसरात पसरलेले अंकोरवाट मंदिर हे जगातील सर्वांत मोठे मंदिर आहे. अमेरिकेत एका भूप्रदेशात श्री यंत्राचा आकार कोरलेला आढळून आला. कांगो देशात श्री गणेशचतुर्थी साजरी केली जाते. जगातील कुठल्याही देशात उत्खनन केल्यावर तेथे हिंदु संस्कृती, परंपरा यांच्या जवळ जाणार्‍या काहीतरी खाणाखुणा, वस्तू, शिल्प किंवा मूर्ती सापडतात. हा हिंदु धर्म पूर्वी जगभर असल्याचाच पुरावा आहे.

संयुक्त अरब अमिरातमध्ये श्रीकृष्ण मंदिर बांधण्यात येणार आहे. तेथील शाळा-महाविद्यालये यांमध्ये रामायण-महाभारत या हिंदूंच्या धर्मग्रंथांवर आधारित धड्यांचा समावेश करण्याचे आदेश तेथील राजाने दिले आहेत. अमेरिकेत ‘इस्कॉन’च्या (श्रीकृष्ण भक्ती शिकवणारा संप्रदाय) माध्यमातून अनेक ख्रिस्ती लोक श्रीकृष्णाची भक्ती करून अंतरंगातून हिंदु धर्म आचरणात आणत आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री ज्युलिया रॉबटर््स, अमेरिकी राजकारणी तुलसी गबार्ड यांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे. जग वेगाने हिंदुत्वाकडे चालल्याचा धसका घेऊन कि काय, धर्मांध आणि साम्यवादी यांनी जागतिक स्तरावर हिंदुत्वाच्या उच्चाटनासाठी एक परिषद भरवली होती. तिचे परिणाम बांगलादेश आणि बंगाल येथे हिंदूंवरील आक्रमणे वाढण्यात झाला, असे म्हटले तर चुकीचे काय ? तरी जो हिंदु धर्म मोठ्या दुष्प्रवृत्तींना नष्ट करता आला नाही, तो सध्याच्या विरोधकांकडून कधी नष्ट होईल का ? तरीही धर्मकर्तव्य म्हणून हिंदूंनी संघटित व्हावे आणि हिंदु धर्माचा जोमाने जगभर प्रसार करावा !