वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे. विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून अशा प्रकारे केल्या जाणार्‍या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. वैचारिक आतंकवादाची उदाहरणे 

१ अ. हिंदु राष्ट्राची मागणी : जेव्हा आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करतो, तेव्हा विरोधक म्हणतात की, ही मागणी घटनाविरोधी आहे; कारण राज्यघटनेमध्ये ‘आपण ‘सेक्युलर’ (निधर्मी) आहोत’, असे म्हटले आहे. तेव्हा ते जाणीवपूर्वक हे लपवतात की, हा ‘सेक्युलर’ शब्दच मूळ राज्यघटनेत नव्हता, तर तो तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या वेळी घुसडवला आहे. ‘जर आणीबाणी हे लोकशाहीवरील आक्रमण होते’, असे मानले जाते, तर तो ‘सेक्युलर’ शब्द आम्हाला बंधनकारक का असावा ? मग ते म्हणतात, ‘आपले राज्य कायद्याचे आहे आणि राज्यघटना ही कायद्याचे मूळ आहे.’

१ आ. समान नागरी कायदा, लव्ह जिहाद आणि कलम ३७० : ‘समान नागरी कायदा अस्तित्वात यायला पाहिजे’, असे आम्ही म्हणतो; कारण त्याविषयी राज्यघटनेत लिहिलेले आहे. तेव्हा विरोधक म्हणतात की, नाही. जरी ते राज्यघटनेत लिहिलेले असले, तरी तो भावनेचा आणि अल्पसंख्यांकांना सांभाळून घेण्याचा प्रश्न आहे.

जेव्हा आम्ही म्हणतो की, ‘लव्ह जिहाद’ चुकीचा आहे. तो आमच्या (हिंदु) संस्कृतीचे जतन आणि भावना यांचा प्रश्न आहे. तेव्हा ते पुन्हा म्हणतात की, तुमची मागणी चुकीची आहे; कारण ती राज्यघटनेच्या विरोधात आहे.

जेव्हा आम्ही म्हणत होतो की, राज्यघटनेचे कलम ३७० रहित व्हायला पाहिजे होते; कारण ते देशाच्या अस्मितेसाठी घातक होते. तेव्हा ते म्हणत होते की, नाही. तो कलम ३७० म्हणजे सर्वधर्मसमभाव आणि काश्मिरी जनतेच्या संस्कृतीचा प्रश्नही आहे. (कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा, म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य होते ! कलम ३७० मधील विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना विसर्जित करण्याचाही अधिकार नाही. हे कलम केंद्रशासनाने आता रहित केले आहे. – संकलक)

१ इ. गोमाता : जेव्हा आम्ही म्हणतो की, गाय हा आमच्या भावनेचा प्रश्न आहे. गोपालन आणि गायींचे रक्षण यांविषयी राज्यघटनेत लिहिलेले आहे. तेव्हा विरोधक म्हणतात की, गाय हा भावनेचा प्रश्न नाही, तर पोटाचा प्रश्न आहे; कारण गोमांस हे स्वस्तात मिळणारे ‘प्रोटीन’ आहे. ते म्हणतात की, शेतकर्‍यांना भाकड गायी पोसायला लावणे, हा त्यांच्यावरील अन्याय आहे; परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विरोधक कधीच जात नाहीत.

१ ई. एक राष्ट्र : जेव्हा आम्ही म्हणत होतो की, हे एक राष्ट्र आहे आणि त्याची फाळणी होऊ नये. तेव्हा ते म्हणत होते, ‘नाही. हे एक राष्ट्र नाही. हा अनेक संस्थाने, भाषा आणि संस्कृती असणार्‍या लोकांचा घोळका आहे. याची धर्मनिहाय फाळणी होऊन मुसलमानांना त्यांचे राष्ट्र मिळाले पाहिजे.’ जेव्हा मुसलमान तिकडे गेले, तेव्हा ‘हे हिंदु राष्ट्र्र झाले पाहिजे’, असे आम्ही म्हणतो, तेव्हा ते म्हणतात की, नाही. हे असे राष्ट्र आहे की, ज्याची संस्कृती सर्वसमावेशक आणि समानतेची आहे. हे एक राष्ट्र आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे हे चुकीचे आहे.

१ उ. पाकिस्तानी हिंदू : जेव्हा आम्ही पाकिस्तानी हिंदूंच्या वेदना पाहून त्यांच्या अन्यायाच्या विरोधात बोलतो, तेव्हा विरोधक म्हणतात की, तो त्यांच्या देशांतर्गत प्रश्न आहे. जेव्हा इस्रायल पॅलेस्टाईनवर आक्रमणे करतो, तेव्हा तो जागतिक मानवाधिकाराचा प्रश्न असतो आणि ‘आम्ही त्यांना साहाय्य करावे’, अशी त्यांची अपेक्षा असते.

१ ऊ. नमस्कार आणि अंधश्रद्धा : जेव्हा आम्ही एखाद्या संतांना किंवा मंदिरातील देवतेला नमस्कार करतो, तेव्हा ते म्हणतात की, ही अंधश्रद्धा आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की, एखाद्या नेत्याचा मुलगा, नातू, पुतण्या, भाचा आहे; म्हणून तो नेता कसा होऊ शकतो ? त्याला मते का म्हणून द्यावीत ? ‘हे नेते देश पालटतील’, असे आम्ही का म्हणून मानावे ? ४९ टक्के मते घेणारा हरतो आणि ५१ टक्के मते घेणारा निवडून येतो, हे कसे ? मग ४९ टक्क्यांवरचा हा अन्याय नाही का ? ‘अल्पसंख्यांकांना सांभाळायला पाहिजे’, असे म्हणणारे ४९ टक्क्यांना कसे सांभाळणार ? तर ते म्हणतात, ‘ही अंधश्रद्धा असू शकत नाही.’

१ ए. ऐतिहासिक गोष्टी आणि राजकारण : आम्ही शेकडो वर्षे झालेली इस्लामी लूट, अत्याचार, धर्मांतर आणि बळजोरी, तसेच ‘काशीच्या मंदिराची मशीद झाली, ताजमहाल हे शिवमंदिर होते’, यांविषयी बोलतो, तेव्हा विरोधक म्हणतात, ‘या जुन्या गोष्टी आहेत. हा सर्वधर्मसमभावी ‘इंडिया’ आहे. इतिहासाचा किस काढून तुम्ही राजकारण करू नका.’

जेव्हा इस्लामी आक्रमणांच्या पूर्वी कधीतरी आर्यांचे द्रविडांवर आक्रमण झाल्याचे म्हटले जाते. त्याचे पुरावेही नाहीत आणि तो सिद्धांत कितपत खरा आहे, अशी शंकाही निर्माण होते. तरीही अनार्य अस्मिता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ‘आर्यांनी द्रविडांवर आक्रमण केले, याचा न्यूनगंड समाजाच्या मनात निर्माण व्हावा’, असा प्रयत्न केला जातो. तेव्हा मात्र हे लोक ‘इतिहास सोडून द्या, त्याचे राजकारण करू नका. हा नवीन भारत आहे’, असे म्हणत नाहीत.

१ ऐ. हिंदू आणि इस्लाम धर्म : ते म्हणतात, ‘धर्म ही अफूची गोळी आहे. त्यामुळे महिलांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश मिळाला पाहिजे.’ मग आपण म्हणतो की, मुसलमान महिलांना मशीद किंवा दर्गा येथे प्रवेश मिळावा; म्हणून एकत्र आंदोलन करूया. मग ते म्हणतात, ‘तुम्ही हिंदू आहात. त्यामुळे आमच्या धर्मातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आधी आम्ही प्रयत्न करणार.’ याचा अर्थ हिंदूंच्या संदर्भात ‘धर्म हीच अफूची गोळी’ आणि इस्लामच्या संदर्भात विषय आला की, दुटप्पी भूमिका घेतली जाते.

२. हिंदूंनी प्रत्येक घटनेकडे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने पहायला आणि कृती करायला शिकले पाहिजे !

अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. यात एक समान प्रक्रिया आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जन आले की, प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा सर्वच सण असो, त्यांना जलप्रदूषण दिसते. जणू जगातील सर्व ठिकाणच्या प्रदूषणाला हिंदूंनी वर्षातून एकदा विसर्जन केलेले काही टनांचे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पाने-फुलेच उत्तरदायी आहेत ! क्रूर विनोद हा की, प्रदूषण नियंत्रण मंडळ एरव्ही घोरत पडलेले असते. श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या नावाने कोल्हेकुई करणारे वर्षभर काहीच करत नाहीत; पण त्यांचा आवाज मोठा असतो. आम्ही त्यांना प्रतिप्रश्न विचारत नाही; कारण हिंदूंना त्यांच्या सीमारेषा सांभाळायची सवय आहे. इतरांसारखे आक्रमण करून प्रदेश व्यापायची नव्हे !

अशा वेळी आम्ही (हिंदू) गोंधळून जातो; कारण आमचे प्रश्न दबून विचारले जातात आणि त्यांची उत्तरे मात्र तारस्वरात किंवा एका सुरात चारही दिशांनी दिली जातात. गोंधळ त्यांचा असतो आणि गोंधळून मात्र आम्ही जातो. कदाचित् सामान्य हिंदूंची त्या अभिमन्यूसारखी गत होत असावी ! ज्याला चक्रव्यूह भेदण्याची कला अवगत नसते आणि सगळीकडून महारथींची आक्रमणे;  मात्र आज ना उद्या ही आक्रमणे परतवून त्या जयद्रथाला सूर्य दिसणारच आहे. त्याचे मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवर जाऊन पडणारच आहे आणि वधाचा सूडही उगवला जाणारच आहे. मग आपण काय केले पाहिजे ? हे पालटण्यासाठी हिंदूंनी प्रत्येक घटनेकडे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने पहायला आणि कृती करायला शिकले पाहिजे, तरच आपण खरे हिंदू होऊ !

३. आतंकवाद आणि त्यातील अंतर्भूत घटक

सध्या आमच्याकडे आलेला नास्तिकतावाद विदेशातून आयात झाला आहे. अनेक नास्तिकतावाद्यांच्या लिखाणात चर्चने गॅलिलिओला कशी आणि का शिक्षा दिली ? इत्यादी तेच ते पुनःपुन्हा येते. जागतिक स्तरावर आतंकवादाच्या करण्यात आलेल्या सर्वसाधारण व्याख्या अजूनही ढोबळ आहेत. त्यात प्रामुख्याने खालील गोष्टी आढळून येतात.

अ. एखाद्या समुहाच्या (मग तो भाषीय, जातीय, प्रादेशिक अथवा धार्मिक असो) मागण्यांसाठी घातपाती कृत्ये करणे.

आ. ही कृत्ये करून त्या समुहाच्या मागण्यांविषयी प्रसिद्धी मिळवणे.

इ. या घातपाती कृत्यांमध्ये विरोधी, तटस्थ किंवा ‘कुणीही’ असू शकतात. जेव्हा रेल्वेमध्ये स्फोट केला जातो किंवा मंदिरात गोळीबार केला जातो, तेव्हा रेल्वेत किंवा मंदिरात कोण माणसे आहेत, हे पाहिले जात नसते. ते समुहातील ‘कुणीही’ अज्ञात असतात.

ई. यातून दहशत निर्माण करून स्वत:ची राजकीय अथवा तत्सम उद्दिष्टे साध्य केली जातात.

४. वैचारिक आतंकवाद्यांपासून हिंदु धर्माला वाचवण्यासाठी त्यांच्या आक्रमक विचारसरणीतील फोलपणा सतत उघड करणे आवश्यक !

या कसोट्यांमध्ये आजमितीला वैचारिक आतंकवाद बसत नाही; कारण यात घातपात येत नाही; परंतु विशिष्ट समुहाने त्यांची ध्येये, विचारसरणी आणि जीवनशैली इतर समाजांवर लादण्यासाठी प्रसृत केलेले विचार म्हणजे संस्कृती अन् मूल्ये यांवरचे आक्रमण नसते का ? त्यात एखाद्या व्यक्तीवर नव्हे, तर त्या समाजावर ते विचार लादण्यासाठी खोट्या तत्त्वांचा वापर करून आधी त्या समाजाच्या विचारधारेला समृद्ध होऊ न देणे, नंतर त्या विचारधारेला घायाळ करणे आणि मग तिला नष्ट करून त्या ठिकाणी स्वत:ची विचारधारा आक्रमण करून मोठी करणे. एकदा ही विचारसरणी रुजली की, आधीच्या विचारसरणीच्या नाशाविषयी अभिमान व्यक्त केला जातो. ही प्रक्रिया घातपाताइतकीच बलपूर्वक राबवली जात नसेल का ?

दक्षिण अमेरिकेत ‘इन्का एम्पायर’ होते. (इन्का नावाचे दक्षिण अमेरिकेतील भारतियांचे साम्राज्य होते. ते ख्रिस्त्यांनी उलथवले.) तेथे ख्रिस्ती धर्म रुजला. आफ्रिका खंडामध्ये एकतर ख्रिस्ती किंवा इस्लाम रुजवला गेला. पर्शिया गेले आणि तिथे इराण आले. तेथील पूर्वीची विचारसरणी कुठे राहिली ? धर्म हे त्याचे एक टोक आहे. त्यातून अनेक बीजे मूळ बियाण्यांसमवेत रुजली नाहीत का ?

हे आपल्याला थांबवायचे असेल, तर आपल्यालाही बोलत रहावे लागेल. ‘त्यांच्या’ प्रश्नांमधील तथ्ये खोडून काढत असतांनाच त्यांच्या सिद्धांतातील आणि कृतीतील फोलपणा यांविषयी आपल्याला खडसावत रहावे लागेल.’

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी हा लेख संग्रही ठेवावा. या लेखाचा उपयोग व्याख्यानाच्या वेळी आणि हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांवर प्रतिवाद करण्यासाठी होईल.