Kerala Shigella Outbreak : केरळम्‌मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – गेल्या काही वर्षांत देशात संसर्गजन्य रोगांचा सर्वाधिक फटका बसलेले राज्य म्हणून केरळम्‌कडे पाहिले जात आहे. आता राज्यात आणखी एक नवीन समस्या उद्भवली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार राज्यात ‘शिगेला’ नावाच्या संसर्गाचा धोका दिसून आला असून याची लागण झालेल्या एका ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या संसर्गाची लागण झालेल्या ३ मुलांना ‘कोळीकोड मेडिकल कॉलेज’ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. या वर्षाच्या आरंभीच राज्यात ‘शिगेला’ची अनेक प्रकरणे आढळून आली होती. यामुळे सार्वजनिक आरोग्याविषयी चिंता निर्माण झाली आहे.

शिगेला संसर्ग म्हणजे नेमके काय ?

वैद्यकीय अहवालांनुसार ‘शिगेला’ हा अत्यंत संसर्गजन्य जिवाणूजन्य आजार आहे. तो आतड्यांवर परिणाम करतो. जर या संसर्गाचे वेळीच निदान झाले नाही, तर गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला रुग्णालयात भरती करणे भाग पडते. लहान मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो.

कशामुळे होतो शिगेला संसर्ग ? त्याची लक्षणे कोणती ?

अस्वच्छ परिस्थिती, दूषित पाणी किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग होऊ शकतो. योग्य स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव असलेल्या भागांमध्ये या आजाराची साथ वारंवार  येते. हा आजार मोठ्या आतड्यांवर परिणाम करतो. यामुळे तीव्र अतिसार (जुलाब), पोटदुखी आणि ताप यांसारखे त्रास उद्भवू शकतात. जगभरात अतिसाराशी संबंधित असलेल्या प्रमुख संसर्गजन्य आजारांपैकी हा एक आहे.